मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच मुंबई पारबंदर प्रकल्प (MTHL) (शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतू) पूर्ण झाला असून आज (दि. १२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. मुंबईतील शिवडी येथून सुरू होणारा आणि नवी मुंबईतील चिर्ले येथे संपणारा अटल सेतू २१.८० किमी लांबीचा आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्प साकारला आहे. या मार्गावरून बस सेवा सुरू होणार का? याबाबत मुंबई, नवी मुंबईतील नागरिकांना उत्सुकता लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> विश्लेषण : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईसाठी किती फायदेशीर? काय आहेत वैशिष्ट्ये?

एमएमआरडीएकडून सात वर्षांपासून या पुलाचे काम सुरू होते. मुंबई पारबंदर प्रकल्प (MTHL) हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. या सेतू पुलाला तीन ठिकाणी इतर महामार्गांची जोड दिली आहे. एमएमआरडीएच्या त्रैमासिक प्रगती अहवालानुसार, २०२४ या वर्षात या मार्गावरून ३९,३०० हजार प्रवासी वाहने धावतील आणि २०३२ पर्यंत १.०३ लाख वाहनांची रहदारी वाढू शकते.

अटल सेतूवर बस सेवा सुरू करावी, असा विचार नवी मुंबई महानगरपालिकेकडून केला जात आहे. नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, पुलाची लांबी पाहता बस प्रवाशांसाठी त्याची उपयुक्तता तपासली जात आहे. पुलालगत बस थांबे नसल्यामुळेही बससेवेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

याचप्रकारे मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणाऱ्या बेस्टनेही पथकर भरण्याच्या कारणास्तव या पुलावरून बस सेवा सुरू करण्याच्या योजनेला अद्याप अंतिम रूप दिलेले नाही. हलक्या वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी २५० रुपये असा पथकर महाराष्ट्र सरकारने निश्चित केला आहे. एमएमआरडीएतर्फे जानेवारी ते मार्च २०२३ या पहिल्या त्रैमासिक प्रगती अहवालात बससाठी ५५० रुपये पथकर प्रस्तावित करण्यात आला आहे.

आणखी वाचा >> “२७ आयफेल टॉवर उभे राहतील, पृथ्वीला दोनदा प्रदक्षिणा…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितली अटल सेतूची वैशिष्ट्ये

दरम्यान, बेस्टच्या बसेस नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सेवा देत असताना मुंबईच्या प्रवेशद्वारावर पथकर भरत आहेत. त्यामुळे रोखीची अडचण असून बेस्टला अटल सेतू मार्गावर पथकरात सूट हवी आहे. याबाबत त्यांना शासन निर्णयाची प्रतिक्षा आहे. बेस्टने मागच्या महिन्यात मुंबईतील प्रवेशद्वारावर पथकर भरण्यापोटी ८६ लाख रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने आपल्या बातमीत दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is it possible to travel from mumbai to navi mumbai by bus from sewri nhava sheva sea link atal setu kvg