Harsh Goenka X post: अब्जाधीश उद्योगपती आणि आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी मुंबईतील उच्चभ्रू भागात होत असलेल्या अल्प मतदानावरून गर्भश्रीमंत मतदारांना खोचक टोला लगावला आहे. श्रीमंतांचा लोकशाहीकडे बघण्याचा उदासीन दृष्टीकोन असल्यामुळे मतदानाचे प्रमाण अत्यल्प राहते, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात आज एकाच टप्प्यात सर्व २८८ मतदारसंघात निवडणूक होत आहे. मुंबईतील श्रीमंत लोक लोकशाही सदृढ करण्याऐवजी स्वतःच्या चैनीच्या जीवनशैलीला अधिक महत्त्व देतात, असाही टोला गोयंका यांनी लगावला.

हर्ष गोयंका यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “मलबार हिलवरील स्त्री आणि पुरुष आज मतदान करणार नाहीत कारण… त्यांच्या मर्सिडीज आणि बीएमडब्लू या आलिशान गाड्यांचे चालक त्यांचे वाहन मतदान केंद्रापर्यंत नेऊ शकतील की नाही? यावर त्यांचा वाद सुरू असेल. मतदान केंद्रावर जाताना त्यांचे महागडे, डिझायनर बूट खराब होण्याची शक्यता आहे. मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या कपड्यांवर गुची सनग्लासेस मॅच करताना त्यांची तारांबळ उडू शकते. तसेच क्विनोआ सलाड खाता खाता ते व्हॉटसॲपवरच योग्य उमेदवार कसा असावा, यावर खल करत असतील.”

हर्ष गोयंका हे कायम आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. सामाजिक जाणिवांबरोबरच इतर अनेक विषयांवर ते आपले परखड मत व्यक्त करताना कचरत नाहीत. त्यांच्या परखड भाष्यामुळे अनेकदा वादही उद्भवलेले आहेत. पण हर्ष गोयंका वाद आणि ट्रोलिंगला भीक न घालता आपले म्हणणे मांडत असतात. आताही त्यांनी मतदानाचा टक्का कमी असल्यावरून श्रीमंताना टोला लगावला आहे.

हे वाचा >> यंदा निवडणुकीत पैशांचा पाऊस, जाणून घ्या किती हजार कोटी जप्त केले?

ओझेम्पिक सुरक्षित आहे की मुंजारो? (ही दोन्ही मधुमेहावरील औषधे आहेत) ही चर्चा अधिक महत्त्वाची असताना मतदानाला जाऊन वेळ का घालवायचा? असाही प्रश्न कदाचित श्रीमंत मतदारांना पडत असावा, असाही टोला गोयंका यांनी लगावला.

शहरी मतदारांमध्ये उदासीनता

२०१९ च्या निवडणुकीपासून शहरी मतदारांमध्ये मतदानाबद्दल निरूत्साह दिसून आलेला आहे. ६२ ते ६४ शहरी मतदारसंघात राज्याच्या सरासरीपेक्षाही कमी मतदान नोंदविले गेले होते. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमधील अनेक मतदारसंघात कमी मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली आहे.