लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याची माहिती समजते आहे. या प्रकरणातील फरार आरोपी झीशान अख्तरची कथित ध्वनिचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाली असून त्यात पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टीने पळण्यास मदत केल्याचा आणि आश्रय दिल्याचा दावा झीशन याने केला आहे. गुन्हे शाखा या ध्वनिचित्रफितीची पडताळणी करत आहे.
सध्या आशिया पासून दूर असल्याचा दावा झीशान अख्तरने केल्याचे ध्वनिचित्रफितीत दिसते आहे. त्या ध्वनिचित्रफितीतही प्रतिस्पर्धी शत्रूंना त्याने धमकी दिली आहे. ध्वनिचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली असून मुंबई पोलिसांकडून या प्रकाराची पडताळणी सुरू आहे.
सिद्दीकी प्रकरणातही लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधीत २६ आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई यालाही आरोपी करण्यात आले आहे. अनमोल माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील आरोपींच्या संपर्कात होता. याशिवाय प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला हत्येप्रकरणातही त्याचा सहभाग आहे. बनावट पारपत्राच्या आधारे तो भारतातून पळून गेला होता. तो कॅनडा व अमेरिकेत ठिकाण बदलून राहत होता. याशिवाय केनियामध्येही तो गेला होता, अशी माहिती आहे.
अनमोलविरोधात १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३२ वर्षीय सुजीत सिंह याला अटक केली आहे. त्याने परदेशातील गुंडासोबत संपर्क साधला होता. सिंह विविध समाज माध्यमातून अनेक खात्यांद्वारे संवाद साधला. तो परदेशातील गुंड अनमोल बिष्णोई असल्याचा संशय आहे. याप्रकरणातील अटक आरोपी सुजीत सिंह हा मुंबईचा रहिवासी आहे आणि त्याला बाबा सिद्दिकीच्या हत्या प्रकरणात त्याचा शोध सुरू होता. पंजाब पोलीस व मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सिंहला लुधिय़ानातून पकडण्यात आले होते. सिंह बाबा सिद्दिकी यांना मारण्याच्या कटात सहभागी होता. तो पूर्वी घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात राहात होता आणि लुधियानामध्ये अटक करण्यात आली होती. तो अनमोलसह मोहम्मद झिशान अख्तर याच्याशीही संपर्क साधत होता.
सिद्धीकी यांच्यावरील संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी झिशान अख्तरवर सोपवण्यात आली होती. त्याने सर्व गुंड जमा करून सिद्दीकी यांच्यावर गोळीबार घडवून आणला. पण या हल्ल्याच्या पूर्वीच तो पळून गेला. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला नाही. आता त्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. झिशान अख्तर देश सोडून गेल्यामुळे आता पोलीस त्याच्याविरोधात पुढील कारवाई करू शकतील. पण सध्या या व्हिडिओच्या सत्यतेबाबत पोलीस तपास करत आहेत.