मुंबई : जंगली रमी आणि रमी सर्कल हा ऑनलाइन गेमिंग खेळ नशिबाचा की कौशल्याचा भाग आहे ? याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकार आणि संबंधित गेमिंग ॲपला दिले.
जंगली रमी आणि रमी सर्कल या ऑनलाईन खेळांच्या ॲपवर बंदी घालण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी सोलापूरस्थित सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे यांनी जनहित याचिका केली आहे, मात्र ही याचिका सुनावणीयोग्य आहे की नाही तसेच ऑनलाइन रमी हा संधीचा खेळ न मानता कौशल्याचा खेळ का मानला जातो हे स्पष्ट करण्याचे आदेश प्रतिवाद्यांना दिले.
हेही वाचा – Mumbai Rains : अंधेरीत उघड्या नाल्यात पडून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू
या ऑनलाईन खेळांची तरुणांना भुरळ पडली असून या जुगारामुळे गंभीर आर्थिक, सामाजिक नुकसान होत आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. सेलिब्रेटी, क्रिकेटपटू यांच्यातर्फे या ऑनलाईन खेळांच्या जाहिराती करण्यालाही याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह विविध उच्चस्तरीय कार्यालयांना निवेदने देऊन दोन्ही ॲप्सवर बंदी घालण्याची विनंती केली होती, मात्र त्यांच्याकडून कोणताही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आणि कारवाई न झाल्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याचे ननावरे यांनी याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा – संध्याकाळी मुसळधार; मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांना पावसाने झोडपले
हे ऑनलाईन खेळ जुगाराला प्रोत्साहन देऊन संबंधित कायद्यांचे उल्लंघन करत आहेत. जुगार हा संधीचा, नशिबाचा खेळ मानला जात असल्यामुळे भारतात त्याला कायदेशीर मान्यता नाही. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीचा दाखला याचिकाकर्त्यांनी याचिकेत दिला आहे. त्यानुसार, अशा ऑनलाइन जुगाराशी संबंधित ॲपला कोणत्याही प्रकारच्या परवानग्या नसल्याचे सरकारने स्पष्ट केल्याचा दावा केला आहे.
© The Indian Express (P) Ltd