लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचे यश आणि ‘सरदार उधम’ या चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार यामुळे सध्या अभिनेता विकी कौशल चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटातील गाण्याच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने तो नुकताच माध्यमांसमोर आला. त्याने वाढवलेली दाढी, त्याचा एकूणच लूक पाहता तो लवकरच ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात विकी कौशल संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले.
विकी कौशल – सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले होते. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर विकी कौशल पुन्हा एकदा लक्ष्मण उत्तेकर यांच्याबरोबर काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. उत्तेकर ‘छावा’ या संभाजी महाराजांवरील हिंदी चित्रपटाची तयारी करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन करत आहेत. चित्रपटाचे लेखक ऋषी विरमणी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मण उतेकर संभाजी महाराजांवरील चित्रपट दिग्दर्शित करत असल्याची माहिती दिली होती.
आणखी वाचा-वायआरएफच्या भजन कुमारचा चेहरा आला समोर…
उतेकर यांचा महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहास यांचा चांगला अभ्यास आहे. शिवाय ‘छावा’ या चित्रपटासाठी अभ्यास – संशोधनही करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटातील संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत विकी कौशल योग्य ठरेल यावर सगळ्यांचेच एकमत झाले आणि त्याची निवड झाली, असेही त्यांनी सांगितले. ‘छावा’चे चित्रीकरण सुरू असतानाच विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमातही व्यग्र असल्याचे सांगण्यात येते.