मुंबई : ‘आयसिस’ महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणातील आरोपी ईमेल व समाज माध्यमांद्वारे म्होरक्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सायबर न्यायवैधक अहवालातून स्पष्ट झाला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) तपासानुसार एका आरोपीने २०१६ मध्ये सर्वप्रथम आयसिसला ईमेल करून संघटनेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तो टेलिग्रामद्वारे हस्तकाच्या संपर्कात असल्याचे इलेक्ट्रॉनिक पुराव्यांतून उघड झाले आहे. याप्रकरणी नुकतेच सहा आरोपींविरोधात एनआयएने चार हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
ताबिश सिद्दीकी, झुल्फिकार अली, शरजील शेख आणि आकीफ अतीक नाचन, झुबेर शेख आणि अदनान अली सरकार या आरोपींविरोधात विशेष एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यातील ताबीश सिद्धीकीच्या मोबाईलच्या तपासणीत ताबीश व झुल्फिकार दोघेही २०१५ पासून एकमेकांच्या संपर्कात होते.त्यावेळी दोघांच्याही बैठकीत त्यांनी आयसिसमध्ये सामील होण्याबाबत ठरवले होते. त्यावेळी ३१ जुलै २०१६ मध्ये ताबीशने सर्वप्रथम आसिसला ईमेल करून संघटनेत सामील करून घेण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्याने अबु बरक बददादीलाआपले प्रमुख स्वीकारले होते. २५ फेब्रुवारी २०१७ आयसिसकडून प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी आयसिसकडून मिळालेल्या ईमेलमध्ये ताबिशचे कौतुक करून त्याला संपर्क माहिती देण्यास सांगितले होते. तसेच संपर्कात राहण्यासही ईमेलमध्ये सांगण्यात आले होते. बगदादीच्या मृत्यूनंतर २०२२ मध्ये तो आयसिसच्या मासिकासंबंधीत टेलिग्राम आयडी नाशीर अल हिंद व सावंत अल हिंद यांच्याशी जोडला गेला. स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्याने कव्हर मी सेकंड फोन नंबर हे मोबाईल अॅप्लिकेशनही विकत घेतले. त्यासाठी त्यांच्या बँक खात्यातून ८९० रुपये भरल्याचे पुरावेही एनआयएच्या हाती लागले आहेत.
हेही वाचा >>>सोलापूरमधील सर्वात मोठ्या पीएमवाय प्रकल्पातील १५ हजार घरांचे काम पूर्ण; १२ जानेवारीला प्रातिनिधिक चावी वाटप ?
आयसिसचा प्रसार करण्यासाठी ताबीशने स्टेजेस ऑफ जिहाद व गजवा ए हिंदशी संबंधीत मजकूर टेलिग्रामवरून पाठवल्याचेही तपासात उघड झाले आहे. तो अबु हमजा व शादाब खान नावाच्या व्यक्तींसोबत टेलिग्रावरून संपर्कात होता. त्यांच्यात बायथ व जिहादबाबतही संभाषण झाल्याचे इलेक्ट्रॉनिक पुराव्यातून तपास यंत्रणेला समजले आहे. तो फेब्रुवारी २०१३ पासून टेलिग्रामद्वारे आयसिसच्या हस्तकांच्या संपर्कात होता. तसेच फेब्रुवारी २०२३ तो आयसिसमध्ये सामील होण्यासाठी अफगाणीस्तानला जाण्याचे तयारीत होता, असेही उघड झाले आहे. याशिवाय आयसिसशी संबंधीत संस्था मर्सिफुल हँडला आरोपी शरजील शेखने १७६ अमेरिकन डॉलर्स(१४ हजार ६६६ रुपये) पाठल्याचे पुरावेही एनआयएला मिळाले आहेत.
दहशतवादी योजना आखणे, त्यासाठी अर्थसहाय्य मिळवणे असे विविध कामे करत होते. एनआयएने २८ जून २०२३ ला सहा आरोपींंविरोधात गुन्हा दाखल केला होता. या कालवाधीत कोंढवा परिसरात ‘एनआयए’ने छापा होता. ‘एनआयए’ने महाराष्ट्र मॉड्यूलप्रकरणी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला व आकीफ आतिक नाचन यांना अटक केली होती.