इस्लामिक स्टेट ऑफ इराक-सीरिया म्हणजेच आयसिसचा धोका भारताला नाही, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्रमुखांनी स्पष्ट केलेले असले तरी आयसिसच्या वाढीसाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न केले जात असल्याची बाब पुढे आली आहे. फेसबुकसारख्या लोकप्रिय समाज माध्यमाचा त्यासाठी वापर केला गेल्याचे गुप्तचर विभागाने केलेल्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आयसिसचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी झालेला असला तरी अशा समाज माध्यमांवर आता राज्याच्या एटीएसची खास नजर असल्याचे एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने मान्य केले.
डिसेंबर २०१३ मध्ये शफी आरमारने फेसबुकवर दोन पेजेस ‘युसुफ अल हिंदी’ या नावे निर्माण केली. आयसिसकडे मुस्लीम तरुणांना आकर्षित करणे हा यामागे हेतू होता. ही दोन्ही पेजेस आता गुप्तचर विभागाने बंद केली तरी या साहाय्याने अरमानला भारतातील तब्बल २० तरुणांना आयसिसकडे आकर्षित करता आले. फेसबुकवरील या पेजेसना जे तरुण भेट देऊन आवडल्याची नोंद करीत होते, त्या प्रत्येक तरुणाला शफी अरमार संपर्क करीत होता. या पद्धतीने त्याने मुदब्बीर शेख आणि खलिद अहमद नवाझुद्दीन ऊर्फ रिझवान याच्यासह तब्बल २० जणांना तरी आयसिसकडे आकर्षित केले, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader