येत्या २६ जानेवारीला ‘इसिस’ मुंबईत स्फोट घडवेल अशा आशयाचा संदेश मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रसाधनगृहात आढळल्याने खळबळ उडाली आहे. ६ जानेवारीलाही अशाच आशयाचा संदेश आढळला होता. १५ दिवसांत दोन वेळा असे संदेश आढळल्याने विमानतळ सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
गुरुवारी संध्याकाळी विमानतळाजवळील पुरुषांच्या प्रसाधनगृहात एका सफाई कर्मचाऱ्याला हा संदेश लिहिलेला आढळला. ‘१६-१-२०१५, इसिस-बॉम्ब-ओके’ अशा सांकेतिक भाषेत िभतीवर हा संदेश लिहिण्यात आला होता. त्याच्या शेजारी एक विमानाचे चित्रही काढण्यात आले होते. ६ जानेवारीलासुद्धा विमानतळाच्या टी-२ टर्मिनसच्या एका पुरुष प्रसाधनगृहातील भिंतीवर १० जानेवारीला मुंबईत इसिस स्फोट घडविणार आहे, अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आला होता.
पंधरा दिवसांत एकाच पद्धतीने दोन वेळा असे संदेश लिहिलेले आढळल्याने हा खोडसाळ प्रकार असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ (सीआयएसएफ)नेसुद्धा विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. या भागातील सीसीटीव्ही तपासून या प्रकरणाचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader