मुंबई : इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केलेली टिप्पणी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनी म्हटले आहे. लापिड यांच्या विधानामुळे भारत-इस्रायल संबंधांना धक्का बसला असला तरी या वादामुळे उलट दोन्ही देश अधिक जवळ येतील असा दावा त्यांनी केला.

इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे अध्यक्ष असलेल्या लापिड यांनी ‘काश्मीर फाइल्स हा चित्रपट अत्यंत बटबटीत आणि प्रचारपट आहे,’ अशा शब्दांत टीका केली होती. यावर काश्मीर फाइल्सचे मुख्य कलाकार अनुपम खेर, निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी जोरदार आक्षेप घेतला. शोशानी यांनी मंगळवारी खेर यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘आपण स्वत: किंवा इस्त्रायल सरकार अधिकृतरित्या किंवा अनधिकृरित्या लापिड यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करत नाही. हा चित्रपट म्हणजे प्रचारपट नाही, तर त्यातून विस्थापित झालेल्या नागरिकांची व्यथाच मांडली गेली आहे’, असे शोशानी म्हणाले. ‘सोमवारी लापिड यांनी हे विधान केल्यानंतर आज सकाळी मी पहिला दूरध्वनी खेर यांना केला, तो माफी मागण्यासाठी. लापिड यांच्या विधानाशी इस्रायलचा कोणताही संबंध नाही, हेदेखील मी त्यांना सांगितले.’ या वादामुळे भारत-इस्रायलचे संबंध अधिक दृढ होतील असा दावाही शोशानी यांनी केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

टीकेला उत्तर देताना खेर म्हणाले की, ‘लापिड हेच बटबटीत आणि प्रचारकी आहेत. त्यांना चित्रपट आवडला नसेल, तर ते तसे सांगू शकतात. मात्र ज्युरीचे अध्यक्ष असताना बटबटीत, प्रचारपट असे शब्द वापरणे गैर आहे. या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांच्या व्यथा जगापर्यंत पोहोचल्या.’ यावेळी खेर यांनी लापिड यांचा उल्लेख ‘टूलकिट गँग’ असा केला. फौदा या इस्रायली मालिकेतील सर्व कलाकार गोव्यात आले होते. मात्र सगळे लक्ष आपल्याकडे वळविण्यासाठी लापिड यांनी हे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप खेर यांनी केला आहे.

चित्रपट बनवणे थांबवेन – अग्निहोत्री

चित्रपटातील एखादा प्रसंग सत्यावर आधारित नसल्याचे सिद्ध केले तर आपण चित्रपट बनवणे थांबवू, असे आव्हान काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिले आहे. लापिड यांच्या टीकेला ट्विटरवरून उत्तर देताना अग्निहोत्री म्हणाले,‘जगभरातील बुद्धिजीवी आणि शहरी नक्षली तसेच इस्रायलमधून आलेले महान चित्रपट निर्माते यांना मी आव्हान देतो. काश्मीर फाईल्समधून एकही दृष्य, संवाद किंवा घटना संपूर्ण सत्य नसल्याचे सिद्ध केले तर मी चित्रपट बनवणे थांबवेन. मी माघार घेणारा माणूस नाही. माझ्याविरोधात कितीही फतवे काढा. मी लढतच राहीन.’

माफी मागावी..

लापिड यांच्या वक्तव्यावर इस्रायलमधूनही प्रतिक्रिया उमटल्या. ज्येष्ठ इस्रायली दिग्दर्शक डॅन वोल्मन म्हणाले की इफ्फी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी माझे सहकारी आणि मित्र नदाव लापिड यांनी काश्मीर फाईल्सबाबत केलेले विधान गैर होते. ते माफी मागतील, अशी अपेक्षा आहे.

लपिड यांच्यासारखे लोक ‘टूलकिट गँग’चे सदस्य आहेत. त्यांनी ३० सेकंदांचे भाषण दिले आणि ते सर्वत्र पसरवले गेले. एका व्यक्तीमुळे संपूर्ण चित्रपट महोत्सवावर डाग लागणे दुर्दैवी आहे.  – अनुपम खेर, अभिनेते

Story img Loader