मुंबई : तापमानवाढ, हवामानातील बदल तसेच चक्रीवादळांचा धोका आदींची पूर्वसूचना देण्यासाठी एका हवामानाची देणाऱ्या उपग्रहाची निर्मिती करण्यात येत असून या उपग्रहाचे प्रक्षेपण जानेवारी २०२४मध्ये करण्यात येणार आहे. सध्या आपण तापमानवाढ आणि हवामान बदल अशा समस्यांना सामोरे जात आहोत त्यावर हा उपग्रह उत्तम कामगिरी करणार आहे, असे स्पष्ट मत इस्त्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आयआयटी मुंबईच्या’ टेकफेस्टच्या २७ व्या पर्वाला बुधवार, २७ डिसेंबरपासून सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी टेकफेस्ट अंतर्गतच्या व्याख्यानमालेत डॉ. एस.सोमनाथ यांनी ‘इस्त्रो’,अंतराळ क्षेत्र आणि भारताच्या मोहिमा आदी संबंधित विषयावर उपस्थितांना माहिती दिली.

हवामान, वायू प्रदूषण आणि हरितगृह यावरही उपग्रह निर्माण करुन त्यातून संकलित केलेली माहिती ही संपूर्ण जगभरातून घेण्यात येईल आणि या माहितीचा उपयोग वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास, त्यावरील उपाय यासाठी करता येईल. त्याबाबत २० ला योगदान देण्यास विचारणा करण्यात आली असून पुढील दोन वर्षांत हे उपग्रह प्रक्षेपित केले जातील, अशी माहिती व्याख्यानादरम्यान डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली. आयआयटी मुंबईच्या दिक्षांत सभागृहात पार पडलेल्या या व्याख्यानाला तंत्रज्ञानप्रेमी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते..

हेही वाचा >>> विरुद्ध अवयव रचना असलेल्या महिलेच्या पित्ताशयावर केली दुर्मीळ शस्त्रक्रिया, व्ही. एन. देसाई रूग्णालयातील डॉक्टरांनी दिले महिलेला जीवदान

भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीसाठी काय योग्य अयोग्य इत्यादी गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी ‘कृषी उपग्रह’ निर्माण करण्याची तयारी सुरू आहे. या उपग्रहामुळे कृषी व्यवसायाला मदत करता येईल तसेच यामुळे जमिनीचा अभ्यास, ती जमीन कोणत्या पिकांसाठी योग्य आहे तसेच पिक वाढीसाठी फायदेशीर काय ठरेल या सगळ्याचा अभ्यास हा उपग्रहाद्वारे केला जाईल. दरम्यान, भविष्यात आपल्याला बरीच आव्हाने आहेत, त्याला तोंड देण्यासाठी मी स्वतः उत्सुक आहेच पण सध्याच्या पिढीकडून देखील अनेक अपेक्षा आहेत, असेही इस्त्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ म्हणाले.

गाडी थांबवून विद्यार्थ्यांसह छायाचित्र

डॉ. एस. सोमनाथ यांना जवळून पाहता यावे, त्यांची भेट व्हावी आणि त्यांच्यासोबत एक छायाचित्रही काढावे, असे प्रत्येकाला मनोमन वाटत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्याख्यान संपल्यानंतर सभागृहाच्या मागील प्रवेशद्वारावर मोठी गर्दी केली होती. व्याख्यान संपल्यानंतर काही वेळानंतर डॉ. एस. सोमनाथ यांची गाडी प्रवेशद्वारातून बाहेर आली. तेव्हा डॉ. एस. सोमनाथ यांना पाहून विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला. त्यामुळे विद्यार्थ्यांना निराश न करता डॉ. एस. सोमनाथ यांनी खिडकी उघडून त्यांना हात दाखवला आणि अखेर गाडी थांबवून बाहेर आले. गाडीतून उतरल्यानंतर डॉ. एस. सोमनाथ यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासह समूह छायाचित्रही काढले. यावेळी विद्यार्थांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता आणि ‘आज साक्षात देवाची भेट झाली’ अशा प्रतिक्रिया तंत्रज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांमध्ये उमटल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro chief dr s somanath talk about weather satellite for india in techfest iit bombay mumbai print news zws