महाराष्ट्रातील राजकारणाबरोबरच सध्या राज्यभरातच नाही तर देशभरामध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशीसंबंधित अमली पदार्थ विरोधी पथकाचे म्हणजेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपींची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांनी वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा करत आहेत.
वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केल्यानंतर आता मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाह नामा ट्विटरवरुन शेअर केलाय. मात्र नवाब मलिक करत असलेली टीका हा वैयक्तिक आरोप असल्याचा एक सूर सोशल नेटवर्किंगवरुन उमटताना दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणामध्ये तपास अधिकाऱ्याचा धर्म आणि जात काढण्यावरुन टीका केलीय. मात्र आता यासंदर्भात नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे.
समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी फेटाळून लावल्यानंतर आज नवाब मलिक यांनी थेट समीर वानखेडेंचा निकाह नामाच ट्विट केला आहे. समीर हे मुस्लिम असल्याच्या आपल्या दाव्याला समर्थन करणारे ट्विट्स मलिक यांनी केले आहेत. मात्र त्याचबरोबर त्यांनी समीर वानखेडेंच्या धर्मावरुन त्यांना लक्ष्य केलं जात असल्याच्या टीकेवरही आपली भूमिका स्पष्ट केलीय.
“मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की समीर दाऊद वानखेडेंबद्दल मी करतोय ते खुलासे हे त्यांच्या धर्माबद्दल नाहीयत. मला फक्त हे प्रकाशझोतात आणायचं आहे की त्यांनी कशाप्रकारे फसवणूक करुन जात प्रमाण पत्र बनवलं आणि त्याच्या माध्यमातून आयआरएसची नोकरी मिळवली. त्यांनी असं करुन मागस वर्गातील एका उमेदवाराला त्याच्या हक्काचं उज्वल भविष्य नाकारलं आहे,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांनी केलेली टीका…
समीर वानखेडेंच्या धर्माविषयी नवाब मलिक यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्या मुद्द्यावरून देखील फडणवीसांन आक्षेप घेतला आहे. “एखादा तपास अधिकारी कारवाई करतो म्हणून त्याची जात-धर्म काढायचा हे दुर्दैवी आहे. शेवटी वानखेडेंच्या पत्नीला खुलासा करावा लागला. वानखेडे चुकले असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे हे मान्य आहे. पण हेतुपुरस्सर अधिकाऱ्याला टार्गेट करणं मान्य नाही. या प्रकरणात आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे एनसीबीच्या वरिष्ठांशी त्याची चौकशी करायला हवी”, असं फडणवीस म्हणाले.
…म्हणून राज्य सरकार हा वाद वाढवतंय
दरम्यान, आर्यन खान, समीर वानखेडे यांच्याबाबत राज्य सरकार विशिष्ट कारणासाठी वाद वाढवत असल्याचा दावा फडणवीसांनी केला. “त्यांची राज्यात इतकी प्रकरणं सुरू आहेत आणि इतक्या प्रकरणांमध्ये ते फसले आहेत, की त्यावरून त्यांना राज्याचं लक्ष हटवायचं आहे. म्हणून महाराष्ट्र सरकार हा वाद वाढवतंय”, असा आरोप फडणवीसांनी केला.