मुंबई : वस्त्रोद्योगातील बालमजुरीची समस्या मांडणारा ‘अनुजा’ या लघुपटाची ऑस्करच्या ‘लाइव्ह-ॲक्शन शॉर्ट फिल्म’ विभागात स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या लघुपटाची निर्मिती सुचित्रा मटाई यांची असून गुनीत मोंगा या लघुपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. इंडो – अमेरिकन निर्मिती असलेल्या ‘अनुजा’ या लघुपटाची १८० लघुपटांमधून निवड करण्यात आली आहे. याशिवाय, एफटीआयआयचा विद्यार्थी असलेल्या चिदानंद नाईक याने दिग्दर्शित केलेला ‘सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट वन्स टू नो’ हा लघुपटही या विभागासाठीच्या स्पर्धेत निवडला गेला आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची नामांकने १७ जानेवारीला जाहीर होणार आहेत. मात्र, त्याआधी या पुरस्कारांसाठी विविध विभागात निवडण्यात आलेल्या चित्रपट, लघुपट, माहितीपटांची नावे जाहीर करण्यात आली. भारताकडून अधिकृत प्रवेश म्हणून निवडला गेलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेबाहेर गेला आहे. मात्र, ब्रिटनबरोबरची सहनिर्मिती असलेल्या ‘संतोष’ या हिंदी चित्रपटाची ऑस्कर पुरस्कारांसाठीच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म विभागात स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या चित्रपटाबरोबरच भारताचे प्रतिनिधित्व करत इथल्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या ‘अनुजा’ या भारतीय लघुपटानेही यंदाच्या ऑस्करच्या लघुपट श्रेणीत स्थान मिळवले आहे. एडम. जे. ग्रेव्स लिखित, दिग्दर्शित ‘अनुजा’ या लघुपटात सजदा पठाण, अनन्या शानभाग, गुलशन वालिया, सुशील परवाना, सुनीता भादुरीया, जुगल किशोर, पंकज गुप्ता, रोडॉल्फो राजीव हुर्बेट या कलाकारांबरोबरच मराठी अभिनेते नागेश भोसले यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

हेही वाचा : देशभरातील घरांच्या किंमतीत १० टक्क्यांची वाढ ? चटई क्षेत्र निर्देशांकावर १८ टक्के जीएसटी आकारण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव

‘अनुजा’ लघुपटाला ऑस्करच्या स्पर्धा विभागात स्थान मिळाल्याबद्दल अभिनेते नागेश भोसले यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘ऑस्कर सारख्या मानाच्या सोहळ्यात आपला लघुपट असणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बालमजुरी सारखा सामाजिक प्रश्न या लघुपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे’, अशी भावना नागेश भोसले यांनी व्यक्त केली.

Story img Loader