मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘लवकरच जाहीर होईल’चा संदेश
ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे रखडलेला विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असली तरी मुंबई विद्यापीठाचा घोळ कायम आहे. बुधवारी रात्रीपर्यंत जाहीर झालेल्या ३०० हून अधिक निकालांपैकी आठ ते दहा टक्के विद्यार्थ्यांना अद्याप निकाल समजू शकलेले नाहीत. संकेतस्थळावर आसन क्रमांक देऊन निकाल शोधण्याचा प्रयत्न केल्यावर ‘निकाल जाहीर झालेला नाही’ असा संदेश मिळत आहे. तर, विद्यार्थ्यांनी परीक्षा भवन गाठले असता ‘उत्तरपत्रिकांचा शोध सुरू आहे. त्या मिळाल्या की निकाल जाहीर होईल’ असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासोबत चालवलेला खेळखंडोबा सुरूच आहे.
दक्षिण मुंबईतील एका प्रथितयश महाविद्यालयात जीवविज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने मार्चमध्ये परीक्षा दिली होती. पाचव्या सत्रापर्यंत प्रत्येक वेळी तिला ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे मुंबईतील एका नामांकित संस्थेत उच्च शिक्षणासाठी तिचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. बुधवारी रात्रीपर्यंत ३०० शाखा विषयांचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये जीवविज्ञान शाखेचा निकालही लागला. त्यामुळे या विद्यार्थिनीने आपला निकाल पाहण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आसन क्रमांक दिला असता तिला ‘लवकरच निकाल जाहीर होईल’ असा संदेश दिसला. जीवविज्ञानचा निकाल लागला असताना हा संदेश का येत आहे, हे विचारण्यासाठी ही विद्यार्थिनी विद्यापीठात गेली. तेव्हा तिला ‘तुझ्या उत्तरपत्रिका शोधण्याचे काम सुरू असून त्या मिळाल्या की निकाल लावला जाईल’ असे उत्तर देण्यात आले. एवढेच नव्हे तर, ‘रोज इथे येऊन चौकशी करीत राहा’ असा सल्लाही तिला विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी दिली. गुरुवारी सायंकाळपर्यंत या विद्यार्थिनीचा निकाल मिळू शकला नव्हता. सहाव्या सत्राची गुणपत्रिका नसल्यामुळे आता उच्च शिक्षणाचा प्रवेश रखडण्याची भीती या विद्यार्थिनीला वाटू लागली आहे. अशीच अवस्था विज्ञान शाखेत जाहीर झालेल्या इतर विषयांच्या निकालाच्या बाबतीत आहे. विज्ञान शाखेत जाहीर झालेल्या निकालांपैकी सर्वच विषयांमध्ये आठ ते दहा टक्के विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होणे बाकी आहे. यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होऊनही निकाल मिळू शकलेला नाही, असे मत विज्ञान प्रा. डॉ. राजेश सामंत यांनी व्यक्त केले. विद्यापीठाने याबाबतीत वेळीच योग्य ती पावले उचलावित, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. अशीच अवस्था इतर शाखांमधील निकालांचीही असू शकते. यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे हित डोळय़ांसमोर ठेवून आता तरी योग्य ती पावले उचलावीत, असेही सामंत म्हणाले. या संदर्भात परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक दीपक वसावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.