मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच दादरमधील शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मैदानातील माती अद्याप काढण्यात न आल्याने शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी पुन्हा एकदा आक्रमक झाले असून मैदानातील माती काढण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी केली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवाजी पार्कच्या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीला नोटाचा पर्याय अवलंबण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मातीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मैदानातील माती काढण्याची रहिवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरील या मैदानातून उडणाऱ्या धुळीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. धुळीची समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत रहिवाशांनी अनेकदा पालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र गेल्या कित्येक वर्षात या समस्येवर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे रहिवासी संघटनेने गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात प्रदूषण मंडळाला पत्र पाठवून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रहिवासी संघटनेने मैदानात आंदोलनही केले होते. मात्र त्यानंतरही या प्रश्नावर तोडगा निघालाच नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी पार्क रहिवासी संघटनेने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तेव्हा प्रशासनाने माती काढण्यास सुरुवात केली होती. मात्र निवडणुकीनंतर पावसाळ्यात हे काम थांबले होते.
हेही वाचा – प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अभ्यासक्रमांना फटका
आता पावसाळा संपला असून प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. हिवाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा माती उडायला सुरुवात होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने रहिवासी संघटनेने पुन्हा एकदा मैदानातील माती काढण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने बुधवारी सकाळी मैदानाची पाहणी केली. यावेळी पालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. किती खोलीपर्यंत माती काढण्याची गरज आहे, याची यावेळी चाचपणी करण्यात आली. यावेळी मैदानातील चार ठिकाणांची पाहणी करून नऊ इंचापर्यंत माती काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवाजी पार्क रहिवासी संघटनेचे प्रकाश बेलवडे यांनी सांगितले की, मैदानातून उडणाऱ्या धुळीच्या त्रासामुळे रहिवासी, मैदानात खेळण्यासाठी, व्यायामासाठी, फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांना श्वसनाचे व त्वचेचे आजार होत आहेत. त्यामुळे मैदानातील माती काढणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदारांना फटका बसला आहेच, पण आता जर माती काढण्यात आली नाही तर मतदानाच्या वेळी नोटाचा पर्याय निवडण्याचे आवाहन आम्ही रहिवाशांना करू, असा इशारा संघटनेने दिला आहे. माती काढण्याच्या कामाला आचारसंहितेचा अडसर दाखवून अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा बेलवडे यांनी दिला. दरम्यान, याबाबत पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.