वाढत्या असहिष्णुतेमुळे देश सोडण्याच्या विचारात होतो, या वक्तव्यामुळे टीकेचा भडीमार होत असलेल्या आमीर खानच्या समर्थनार्थ काही नेटिझन्स पुढे सरसावले आहेत. यामध्ये ट्विटरकरांचा मोठ्याप्रमाणावर सहभाग आहे. त्यामुळे सध्या ट्विटर आमीर खानला पाठिंबा दर्शविणारा #IStandWithAamirKhan हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे. ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात सोमवारी आमीरने सध्या देशभरात गाजत असलेल्या सहिष्णुतेच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. तो म्हणाला की, या देशाचे नागरिक म्हणून आपण वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचत असतो. काय घडते आहे, ते पाहतो. जे घडते आहे, त्यामुळे मी चिंतीत झालो, हे नाकबूल करणार नाही. अनेक घटनांनी मी व्यथित झालो आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून असुरक्षिततेची भावना वाढते आहे. आपण भारत सोडू या का, असा प्रश्न पत्नी किरणने मला विचारला. हा विचार तिच्यासाठी फारच मोठा आहे. तिच्या मुलाची तिला काळजी वाटते आहे. आमच्या सभोवताली काय वातावरण असेल, याचीही तिला भीती वाटते. तिला रोजचे वृत्तपत्र उघडण्याचीही भीती वाटत असल्याचे यावेळी आमीर खानने सांगितले होते. मात्र, आमीरचे हे विधान चांगलेच वादात सापडले होते आणि आज दिवसभरात त्याला टीकेच्या भडीमाराला तोंड द्यावे लागले होते.

IStandWithAamirKhan, Aamir Khan, Yogi Adityanath, intolerance, Leaving country, Bollywood, Anupam kher, Loksatta, Loksatta news