मुंबई : विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी १६ आमदारांसह सुरत गाठले आणि शिवसेना विधिमंडळ पक्षात उभी फूट पडली. त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये परस्परांवर कुरघोडीचे अनेक प्रयत्न झाले. ठाकरे गटाचे नाव आणि चिन्हही गेले. पण निवडणुकीत ठाकरे गटाने शिंदे यांच्यावर मात करून आपलीच शिवसेना खरी हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला दोन वर्षे पूर्ण होत असताना पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण असताना, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिले. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि मशाल हे नवीन चिन्ह मिळाले. लोकसभा निवडणूक प्रचारात असली आणि नकली शिवसेना हा वाद रंगला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या पक्षाच्या दोन गटांची ताकद स्पष्ट झाली. शिवसेनेच्या शिंदे गटाचा स्ट्राइक रेट ठाकरे गटापेक्षा जास्त असला तरी ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते (१६.७२ टक्के) ही शिंदे गटापेक्षा (१२.९५ टक्के) जास्त आहेत. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या ४२ आमदारांपैकी २० आमदारांच्या मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. यामुळेच जनतेच्या न्यायालयाचा कौल आम्हाला मिळाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

हेही वाचा >>>सकाळी ९ नंतर शाळा सुरू करण्याच्या शासन निर्णयाला बगल ?

पक्षफुटीनंतर महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे शिवसेना ठाकरे गटाचा उत्साह वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ओसंडून वाहत होता. उद्धव ठाकरे यांचाही आत्मविश्वास वाढला होता. दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेची निवडणूक असताना शिवसेनेच्या आमदारांनी मतदान करून गटागटाने ४२ आमदारांनी सुरत, गुवाहटी, गोव्याकडे कूच केली. शिवसेना फुटीवर सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्ष अशा तीन पातळीवर लढाई सुरू होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांना नाव, चिन्ह बहाल केले. त्यामुळे ठाकरे गटाची आशा आता फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आहे.

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले. मात्र लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने तुलनेने चांगले यश मिळवले आहे.

विधानसभेत कोणाची बाजी?

लोकसभेपाठोपाठ विधानसभेत चागंले यश मिळवून शिंदे गटाचे नामोनिशाण पुसून टाकण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्धार आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे दोन खासदार अधिक निवडून आल्याने शिंदे गटाची काहीशी अडचण झाली. आमचीच शिवसेना असली हा दावा करणे आता शक्य होत नाही. विधानसभा निवडणुकीत कोणता गट बाजी मारतो यावर पुढील समीकरणे अवलंबून असतील. शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, चिन्ह, पक्ष सोडून मैदानात उतरण्याचे आव्हान ठाकरे गटाने दिले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It has been two years since the split in shiv sena amy
Show comments