मुंबईः कांदिवली पूर्व येथे एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली रोख रक्कम चोरून चालकाने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने २२ लाख ४३ हजार रुपयांची रोकड पळवली असून याप्रकरणी समता नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तक्रारदार राजाराम घाडीगावकर एका खासगी कंपनीसाठी काम करतात. त्यांची कंपनी विविध बँकांकडून रोख रक्कम घेऊन ती निरनिराळ्या एटीएम यंत्रांमध्ये भरण्याचे काम करते. ते नेहमीप्रमाणे १५ जुलै रोजी साडेतीन कोटी रुपयांची रोकड घेऊन निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत चालकासह दोन सहकारी होते. विविध एटीएम यंत्रांमध्ये रक्कम भरल्यानंतर कांदिवली येथील ठाकूर संकुलातील डिपॉजिट यंत्रामधून त्यांनी २२ लाख ४३ हजार रुपये घेतले. त्यानंतर ते गाडी घेऊन आकुर्ली रोड येथे पैसे भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी व्हॅनमध्ये २२ लाख ४३ हजार रुपये होते. चालकही व्हॅनमध्येच होता. परत आले असता चालक तेथे नव्हता. तसेच व्हॅनमधील २२ लाख ४३ हजार रुपयांची रोखही नव्हती. त्यांनी चालकाचा शोध घेतला. त्यावेळी तो कोठेच सापडला नाही.
हेही वाचा – “किरीट सोमय्या नग्न झाले, पेन ड्राईव्ह घेऊन सभागृहात…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल
घाडीगावकर यांनी चालकाला दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा मोबाईल बंद होता. अखेर याप्रकरणी त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी चालक सागर सोनावणेविरोधात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.