मुंबई : लोकसभेची निवडणूक लोकांनीच हातात घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा त्यांच्याच अंगलट आल्या आहेत. एकूणच भाजपला साध्या बहुमताचा २७२ चा आकडाही गाठणे अवघड असून, केंद्रात सत्ताबदलाची शक्यता स्पष्टपणे दिसते आहे, असा दावा काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात व्यक्त केला. राज्यात महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागा मिळण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपला पुन्हा सत्ता मिळणे कठीण असल्याचे विविध राज्यांमधून आढावा घेताना मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले. देशात एकूणच भाजपच्या विरोधात वातावरण अनुभवास येत आहे. महाराष्ट्रातही चित्र वेगळे नाही. राज्यातील ३२ ते ३५ जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही. शिंदे गटाच्या तीन ते चार जागा निवडून येऊ शकतात, असा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे १२ उमेदवार निवडून येण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला.

हेही वाचा >>> “महाराष्ट्रात भाजपाप्रणीत एनडीएच्या २० जागा कमी होणार”, योगेंद्र यादव यांनी वर्तवला अंदाज; म्हणाले, “४८ जागांपैकी…”

‘चारसो पार’चा नारा हा संविधान बदलासाठी आहे, त्यामुळे दलित समाज विशेषत: आंबेडकरी समाज भाजपच्या विरोधात गेला आहे. या वेळी भाजपच्या विरोधात दलित-मुस्लीम एकत्रीकरण झाल्याचे दिसत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एमआयएमबरोबर युती होती, त्यामुळे त्यांना सहा टक्के मते मिळाली होती. या वेळी युती नसल्याने वंचितची मते कमी होतील, असे चव्हाण म्हणाले.

इंडिया आघाडीला २४० वर जागा

केंद्रात सत्ताबदल होणार, असे चित्र आहे. इंडिया आघाडीला २४० ते २६० पर्यंत जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तविला. भाजपला फार कमी जागा मिळतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा वाढतील, असे एकही राज्य दिसत नाही. या वेळी भाजपला २७२ जागाही मिळणार नाहीत, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे. अब की बार चारसो पार ही घोषणा मोदींच्या अंगलट आली. त्यांनी स्वत:चे व्यक्तिस्तोम माजविले आहे, २०४७ पर्यंत विकसित भारताची संकल्पना मांडताहेत, मात्र त्याची स्पष्टता नाही, मंदिराचा मुद्दा चालला नाही. त्यामुळे त्यांनी आता द्वेषाचे व धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू केले आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

उद्धव ठाकरे, शरद पवारांना सहानुभूती

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकांची सहानुभूती आहे, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. या निवडणुकीत भाजपच्या विरोधात महागाई, बेरोजगारी, आर्थिक गैरव्यवहार, नैतिक भ्रष्टाचार आणि शेवटचा मुद्दा संविधान बचाव हे मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरत आहेत. विशेष म्हणजे या पाचही मुद्द्यांवर मोदी स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is difficult for bjp to get majority ex cm prithviraj chavan expressed in loksatta loksamvad event zws
Show comments