लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यावर शरद पवार यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा सुरू झाली असतानाच २२ जागा लढविणारा राष्ट्रवादी काँग्रेस पंतप्रधानपदाचे दिवास्वप्न बघत नाहीच पण पवार हे पंतप्रधान व्हावेत, अशी राष्ट्रवादीची इच्छाही नाही, अशी गुगली पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी टाकून विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार यांना देशाचे सवरेच पद मिळावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीची नेतेमंडळी व्यक्त करतात. आर. आर. पाटील, मधुकर पिचड यांच्यासारख्या नेत्यांनी तशी मतेही मांडली आहेत. गेल्या निवडणुकीच्या वेळी आर. आर. पाटील यांनी तर जागोजागी पवार यांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा मांडला होता. मात्र तेव्हा आर. आर. पाटील यांनी ती चूक केल्याचे मलिक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. शरद पवार यांना फक्त पंतप्रधानपदात रस असल्याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपाचा उल्लेख करीत मलिक यांनी, राष्ट्रवादीला नेहमीच वास्तवाचे भान असते, याकडे लक्ष वेधले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची घाई झाली आहे. मुख्यमंत्रीपदावरूनच ठाकरे घराण्यात भांडणे होऊन पक्षाची दोन शकले झाली. स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत त्या उद्धव ठाकरे यांच्याकडून कसली अपेक्षा करणार, असा बोचरा सवालही मलिक यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसला वास्तव्याची चांगलीच जाणीव आहे. आघाडीत राष्ट्रवादी फक्त २२ जागा लढविणार आहे. तसेच लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, असे शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. यामुळे पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीतच नाहीत, असेही सांगण्यात आले. पवार यांनी पंतप्रधान व्हावे, अशी राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
ही भावना नेतेमंडळी बोलून दाखवितात. पण स्वत: पवार यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. परिणामी या विषयावर चर्चा करण्यातही अर्थ नाही, असे मलिक यांचे म्हणणे होते.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा राष्ट्रवादीने प्रचारात केला होता. पण त्याचा फारसा उपयोग झाला नव्हता. यंदा हा मुद्दा तापविल्यास त्याचे कोणते परिणाम होतील याचा अद्याप अंदाज पक्षाच्या नेत्यांना आलेला नाही. त्यातूनच राष्ट्रवादीने गुगली टाकल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.
शरद पवार पंतप्रधान व्हावेत ही राष्ट्रवादीचीच इच्छा नाही!
लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यावर शरद पवार यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा सुरू झाली असतानाच २२ जागा लढविणारा राष्ट्रवादी काँग्रेस पंतप्रधानपदाचे दिवास्वप्न बघत नाहीच पण पवार हे पंतप्रधान व्हावेत, अशी राष्ट्रवादीची इच्छाही नाही...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-05-2013 at 05:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is not ncp wish to see sharad pawar as prime minister nawab malik