माझे ऋणानुबंध ज्या नाटय़सृष्टीशी निगडीत आहेत, त्यातून मला वेळोवेळी आनंद आणि समाधान मिळाले  असून त्यामुळे मी संपन्न झाले आहे. चतुरंग प्रतिष्ठानचा हा जीवनगौरव पुरस्कार म्हणजे माझा नव्हे तर नाटय़कलेचा सन्मान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी रविवारी माटुंगा येथे केले.
चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांच्या हस्ते विजया मेहता यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी व्यासपीठावर चतुरंग प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर, समारंभाच्या प्रमुख वक्त्या व ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महाप्रबंधक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, प्रफुल्ला डहाणुकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना मनात आनंद, समाधान व थोडासा अभिमान आहे. प्रेमाने दिलेला हा पुरस्कार म्हणजे पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप आहे. या थापेमध्ये एक नाते दडले असल्याचे सांगून मेहता म्हणाल्या की, जीवनाचे सर्व सार या नात्याशी असते. या थापेत हे नाते आहे. आम्ही नाटकवाली मंडळी नात्याची ही वीण घट्ट विणत असतो.
लेखकाने कागदावर लिहिलेले नाटक कलाकारांच्या सहाय्याने प्रत्यक्ष जीवनानुभव मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करतो. विणले गेलेले हे जाळे प्रेक्षकांवर फेकले जाते, यात प्रेक्षक अडकतात आणि आमच्या पाठीवरची थाप सुरू होते. नाटकाचा प्रत्येक प्रयोग म्हणजे वर्तमान असते. आपला नेमका प्रेक्षक कोण आहे, हे जेव्हा ठरते तेव्हा हे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते आणि विणलेल्या या जाळ्याला अर्थ व पोत प्राप्त होतो, असे विजयाबाईंनी सांगताच रसिकांनी टाळ्यांच्या प्रतिसादात त्यांना आपली दाद दिली.
गुलजार म्हणाले की, विजया मेहता यांनी मराठी नाटक आणि रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले असून नाटक ही जीवंत कला आहे. नाटकाच्या तुलनेत चित्रपट खूपच मागे आहे. विजया मेहता यांचे ‘झिम्मा’ हे आत्मचरित्र वाचले. पुस्तकाची सुरुवात त्यांनी खूप छान केली आहे. या पुस्तकातून त्यांनी स्वत:ही सर्जनशीलतेचा आनंद घेतला असून तो रसिकांनाही दिला आहे. विजयाबाई यांनी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका या नात्याने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकार केल्या. त्यांची प्रत्येक भूमिका म्हणजे त्यांना मिळालेला नवा जन्म आहे. तर डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी सांगितले की, परंपरेचे भान राखत सातत्याने नवनवे प्रयोग करणे आणि जे जे उत्तम आहे त्याचा स्वीकार करणे हा त्यांचा स्वभाव आहे. विविध रंग आपल्यात सामावून घेऊनही त्या एकमेवाद्वितीय असून त्यांच्यात बौद्धिक आणि भावनिक ऊर्जेचा प्रचंड साठा आहे. विजया मेहता यांनी रंगभूमीचे गुरुकुल सांभाळून आपले स्वत:चेही व्यापक असे गुरुकुल निर्माण केले आहे.
डॉ. अरुण टिकेकर यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. विजया मेहता यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे लेखन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर व त्याचे आरेखन सचिन वीरकर यांनी केले आहे. सन्मानपत्राचे जाहीर वाचन प्रा. डॉ. वीणा देव यांनी, सूत्रसंचालन मंगला खाडिलकर यांनी तर प्रास्ताविक मेघना काळे यांनी केले. विद्याधर निमकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.    
cap
ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या हस्ते विजया मेहता यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी
डॉ. अरुण टिकेकर, प्रा. विजया राजाध्यक्ष, डॉ. विनय सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.     छाया- दिलीप कागडा

Story img Loader