मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या पोलीस कोठडीतील कथित आत्महत्येविरोधात अनुजच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनुज याची आत्महत्या संशयास्पद असल्याचा दावा करून त्याच्या आईने प्रकरणाच्या सीबीआयच्या चौकशीची मागणी केली आहे.
पंजाबमधील सुखचैन गावात वास्तव्यास असलेली अनुज याची आई रिता देवी यांनी राज्य सरकार आणि मुंबई गुन्हे शाखेसोबतच अभिनेता सलमान खान यालाही या याचिकेत प्रतिवादी केले आहे. अनुज याने पोलीस कोठडीत आत्महत्या केलेली नाही, तर पोलीस कोठडीत केलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी याचिकेत केला आहे. तसेच अनुज याच्या मृतदेहाचे नव्याने शवविच्छेदन करण्याची, तसेच या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशीची मागणीही केली आहे.
हेही वाचा – बेस्ट बसमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल, मुलुंड पोलिसांकडून सहा बेस्टची तपासणी
सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई सुरू केली. त्याचाच भाग म्हणून विशेष मोक्का न्यायालयाने ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. अनुज याच्या अटकेनंतर तो ‘यह लोग मुझे मार देंगे, मुझे बचा लिजिये’ असे फोनवर ओरडताना ऐकल्याचा आणि त्यानंतर फोन बंद झाल्याचा दावाही त्याच्या आईने याचिकेत केला आहे. प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील कैद चित्रण आणि २४ एप्रिल ते २ मे या कालावधीतील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सलमान खानसह त्याच्या सहकाऱ्यांची फोन संभाषण माहिती जतन करून ठेवण्याची मागणी अनुज याच्या कुटुंबीयांनी केली आहे.