शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेश निश्चित करता येणार असल्याचे पुण्यातील औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने स्पष्ट केले.
हेही वाचा >>> जुन्या इमारतींचा पुनर्विकास: उपनिबंधकांच्या अहवालासाठी ठराविक रक्कम जमा करण्याची सक्ती?
आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिल्यामुळे काही कारणास्तव नियोजित मुदतीमध्ये प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे, अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासह प्रवेश शुल्क भरून ६ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा >>> झोपु प्राधिकरणातील मोक्याच्या नियुक्त्यांमुळे अभियंत्यांमध्ये अस्वस्थता
संस्थास्तरीय तिसऱ्या समुपदेशन फेरीअंतर्गत सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी येत्या ७ सप्टेंबरपर्यंत संधी उपलब्ध असेल. तसेच समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेश फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची व उमेदवारांना माहिती कळविण्याची कार्यवाही ७ सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे.
उमेदवारांनी रिक्त जागांचा अभ्यास करावा
नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी औद्यागिक प्रशिक्षण संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करावा. तसेच संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी उमेदवारांनी व्यक्तिश: ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत सर्व मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा.
– आर. बी. भावसार, उपसंचालक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था