वानखेडे मैदानावर शुक्रवारी होणाऱया शपथविधी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आणि भाजपचेच आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. शिवसेनेचा कोणताही आमदार यावेळी मंत्रिपदाची शपथ घेणार नाही, असे भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी शुक्रवारी सांगितले. त्याचबरोबर सद्यस्थितीत तरी शिवसेना सत्तेत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे, अशा आशयाचे ट्विटही त्यांनी केले आहे. रुडी यांच्या ट्विटवरून दोन्ही पक्षांमध्ये अद्याप स्वीकारार्ह तोडगा निघाला नसल्याचे दिसते.
फडणवीस गुरुवारी दिल्लीच्या दौऱयावर गेले असून, त्यांनी तिथे भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत फडणवीस यांनी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी द्यायची यावर आणि खातेवाटपावर चर्चा केली. यावेळी सुद्धा शिवसेनेला सत्तेत घेतले तरी त्यांच्याकडे कोणतीही महत्त्वाची खाती देण्यात येऊ नये, यावरही वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झालेले आहे. अर्थ, महसूल, गृह, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि जलसंपदा यासारखी महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवण्याचेही भाजपने निश्चित केले आहे. या सर्वपार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील दुरावा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, हे ठरविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांची गुरुवारी संध्याकाळी ‘मातोश्री’वर बैठक होत असून, त्यामध्ये पुढील निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा