मुंबई : ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी ६९८ शस्त्रक्रिया विनापरवानगी केल्याचा ठपका जे.जे. रुग्णालयातील त्रिसदस्यीय समितीने ठेवला आहे. मात्र, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा आणि अहवाल एकतर्फी असल्याचा दावा डॉ. लहाने यांनी केला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. लहाने यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. ‘‘माझ्यावर झालेले आरोप एकतर्फी आहेत. यासंदर्भात माझी कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यात आली नाही. राज्य सरकारने मला आदेश दिल्यानंतर मी काम सुरू केले होते. सर्व शस्त्रक्रिया नियमांच्या चौकटीतच केल्या आहेत’’, असे स्पष्टीकरण डॉ. लहाने यांनी दिले आहे.

ऑगस्ट ते डिसेंबर २०२२ या कालावधीत कोणत्याही पदावर नसताना डॉ. तात्याराव लहाने यांनी जे. जे. रुग्णालयामध्ये विनापरवानगी डोळय़ांच्या शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाची पडताळणी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने रुग्णालय प्रशासनाकडे प्राथमिक अहवाल सादर केला आहे. त्यात डॉ. तात्याराव लहाने यांनी ऑगस्ट ते डिसेंबर २०२२ या कालावधीत विनापरवानगी डोळय़ांच्या ६९८ शस्त्रक्रिया केल्याचा  ठपका ठेवण्यात आला आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या संचालकपदावरून निवृत्त झाल्यानंतर आणि राज्य सरकारच्या अंधत्व निवारण मोहिमेत समन्वयकपदी नेमणूक होण्यापूर्वी डॉ. लहाने यांनी या शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले जाते. नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांनाही नोटीस पाठवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. डॉ. लहाने यांना कोणत्या आदेशाने शस्त्रक्रिया करण्यास सांगितले, याचे स्पष्टीकरण डॉ. पारेख यांच्याकडे मागण्यात आले आहे. या प्रकरणाचा पूर्ण अहवाल अधिष्ठात्यांकडे पाठवला गेल्याचे ही सांगण्यात आले आहे.

समितीने अहवाल सादर केला असला तरी तो गोपनीय असून, मी तो अद्याप पाहिलेला नाही. त्याबद्दल मी आता काहीच बोलू शकत नाही. अहवाल पाहिल्यानंतर योग्य भाष्य करीन. – पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय

सर्व शस्त्रक्रिया नियमांच्या चौकटीतच केल्या आहेत. मी केलेल्या शस्त्रक्रियांमुळे लोकांना दृष्टी मिळाली आहे. त्याचे कौतुक करता येत नसेल तर  करू नका़  पण, त्याचे राजकारण तरी करू नका. – डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ नेत्रविकार तज्ज्ञ