मुंबई : जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील वरिष्ठ डॉक्टरांकडून होत असलेला कथित छळाला कंटाळून त्यांची बदली करण्याची मागणी करत निवासी डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळपासून बेमुदत संप पुकारला. या संपाचे पडसाद गुरुवारी सकाळी बाह्यरुग्ण विभागात उमटले. निवासी डॉक्टरांचा संप लक्षात घेता विभाग प्रमुख, वरिष्ठ प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांमार्फत बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना सेवा पुरविण्यात आली. मात्र, निवासी डॉक्टर नसल्याने उपचारांच्या प्रतीक्षेत रुग्णांच्या रांगा लागल्या.

जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमाचे उल्लंघन करीत असून निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यापासून दूर ठेवत आहेत. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, प्रथम वर्षांच्या निवासी डॉक्टरांचे वेतन आणि तृतीय वर्षांच्या निवासी डॉक्टरांची थकबाकी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून बेमुदत आंदोलन सुरू केले.

मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा निर्धार ‘मार्ड’च्या डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळेच बुधवारी डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नेत्रशल्य चिकित्सा विभागातील सात डॉक्टरांनी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केल्यानंतरही त्याचा कोणताही परिणाम संपकरी निवासी डॉक्टरांवर झाला नाही. निवासी डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशीही संप कायम ठेवल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. बाह्यरुग्ण विभागामध्ये निवासी डॉक्टर नसल्याने रुग्ण सेवेचा सर्व भार वरिष्ठ डॉक्टर आणि प्राध्यापकांवर पडला होता. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्ण सेवा बाधित होऊन रुग्णांना तासन् तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. अनेक रुग्ण गर्दी पाहून घरी गेले. तसेच अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून काही तातडीच्या शस्त्रक्रियाच करण्यात आल्या.

रुग्णालयातील निवासी डॉक्टरांकडून होत असलेले खोटे आरोप आणि अधिष्ठातांकडून अध्यापकांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करून नेत्रशल्य चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख व डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह सात डॉक्टरांनी राजीनामे दिले होते.

राजीनामा अर्ज विहित नमुन्यानुसार नाही

नेत्रशल्य चिकित्सा विभागातील डॉक्टरांनी दिलेले राजीनामे हे शासकीय विहित नमुन्याप्रमाणे नाहीत. अनेक डॉक्टरांच्या राजीनामा पत्रावर तारीख नाही किंवा योग्य स्वाक्षरी नाही, अशा अनेक त्रुटी त्यात आहेत. त्यामुळे राजीनाम्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करून विहित नमुन्यामध्ये राजीनामा अर्ज देण्यास सांगण्यात येईल, असे डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

‘आयएमए’चा पाठिंबा..

जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मनमानी कारभाराविरोधात मार्डच्या डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशन ज्युनियर डॉक्टर्स नेटवर्ककडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. डॉ लहाने आणि डॉ.पारेख यांच्यावर कठोर कारवाई करून निवासी डॉक्टरांचे भविष्य सुरक्षित करा, अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशन ज्युनियर डॉक्टर नेटवर्ककडून करण्यात आली आहे.

Story img Loader