अनिश पाटील
जे. जे. रुग्णालयामध्ये १९९२ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात फरार झालेला प्रमुख आरोपी नझीर मोहम्मद फकी याला तपास यंत्रणेने परदेशातून पकडल्याची जोरदार चर्चा आहे. दाऊदची बहीण हसीना पारकरचा पती इब्राहिम पारकर याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने हा संपूर्ण कट रचला होता. नझीरने या संपूर्ण प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
इब्राहिम पारकर २६ जुलै १९९२ रोजी नागपाडा परिसरातील जयराम लेनमधील त्याच्या हॉटेलमध्ये बसला होता. त्या वेळी गवळी टोळीतील शैलेश हळदणकर व बिपिन शेरे या गुंडांनी हसीना पारकरच्या पतीला गोळय़ा घातल्या. त्या वेळी आरडाओरड झाली. पळून जाणाऱ्या हळदणकर व शेरेला स्थानिकांनी पकडून मारहाण केली. त्यात जखमी झाल्यामुळे या दोघांना जे. जे. रुग्णालयातील कक्ष क्र. १८ मध्ये भरती करण्यात आले होते. बहिणीच्या पतीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी १९९२ मध्ये दाऊद इब्राहिमने सर जे. जे. रुग्णालयात आरोपींना मारण्याचा कट रचला.
हेही वाचा >>> अधोविश्व : मुंबईत चोरलेल्या गाडय़ांचा नेपाळ प्रवास
याची सुरुवात कांजूरमार्ग गोळीबारापासून झाली. कांजूरमार्ग येथे दाऊद टोळीतील काशीपाशी आदी गुंडांनी एके ४७ रायफलमधून अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात अरुण गवळी टोळीतील रवींद्र फडके व जोसेफ परेरा ठार झाले. या वेळी झालेल्या गोळीबारात तीन निरपराध नागरिकांचाही मृत्यू झाला होता. दाऊद टोळीला प्रत्युत्तर म्हणून गवळी टोळीच्या बिपिन शेरे व शैलेश हळदणकर या दोघांनी दाऊदचा सख्खा मेहुणा इब्राहिम पारकरची हत्या घडवून आणली. त्यामुळे दाऊद संतापला होता.
सप्टेंबर १९९२ मध्ये जे. जे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील कक्ष क्रमांक १८ मध्ये दाऊद टोळीचे गुंड शिरले. त्यापूर्वी एका महिलेने या कक्षाची संपूर्ण पाहणी केली होती. कक्षामध्ये किती सुरक्षारक्षक आहेत, शेरे व हळदणकर कोठे उपचार घेत आहेत, याची संपूर्ण माहिती मिळविण्यात आली होती. त्यानंतर मध्यरात्री दाऊदच्या टोळीतील सुनील सावंत, सुभाषसिंह ठाकूर, श्यामकिशोर गारिकापट्टी यांच्यासह इतर गुंड रुग्णालयात घुसले व त्यांनी बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात शैलेश जागीच ठार झाला, तर शेरे गंभीर जखमी झाला. तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस शिपाई चिंतामण जयस्वाल व केवलसिंह भानावत यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.
हेही वाचा >>> अधोविश्व : नोकरीसाठी त्या आल्या होत्या, पण..
या हल्ल्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यासह पाच जण जखमी झाले. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था संपूर्णपणे कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातच हल्लेखोरांनी हल्ल्यासाठी लाल दिव्याच्या गाडीचा वापर केल्याचे उघड झाल्यामुळे सरकारी यंत्रणाही हादरली होती. या संपूर्ण प्रकरणात एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली. नझीरने या हल्ल्यापूर्वी त्याच्या गुंडामार्फत जे. जे. रुग्णालयातील छतावर शस्त्रे लपवली होती. त्यानंतर तेथे हल्लेखोरांनाही पाठवण्यात नझीरचा सहभाग उघड झाला होता. दाऊद टोळीविरोधात मुंबई पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केल्यामुळे नझीरनेही परदेशात पलायन केले. नझीर मुंबईतून फरार झाल्यानंतर पाकिस्तानात वास्तव्यास असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून गुप्तचर यंत्रणा त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. तो बनावट पारपत्राच्या साह्याने फिरत होता. नझीरविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.