लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मागील ६३ वर्ष मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील रूग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारे जे.जे. रुग्णालय नव्या वर्षात कात टाकणार आहे. जे. जे. रुग्णालयातील आरोग्य सुविधा खासगी रुग्णालयांप्रमाणे अद्ययावत, अत्याधुनिक आणि सुसज्ज असाव्यात यासाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला आहे. २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षामध्ये रुग्ण कक्ष आणि अन्य कामांसाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत वित्त विभागाने ७५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून रुग्णालयातील विविध कक्षांचे अद्ययावत सुधारणांसह नूतनीकरण करण्यात येणार आहे.
जे. जे. रुग्णालय मागील ६३ वर्षांपासून अहोरात्र रुग्णसेवा करीत आहे. मात्र अनेक वर्षांपासून रुग्णालयातील कक्षांच्या नूतनीकरणाचे काम झाले नव्हते. दीपक केसरकर यांनी जे.जे रुग्णालयाचा पाहणी दौरा केल्यानंतर सरकारी रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधा, उपचार मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले.
आणखी वाचा-मुंबई : क्रीप्टो करन्सीतील गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून रहिवाशाची फसवणूक
खाजगी रुग्णालयातील अत्याधुनिक व सुसज्ज अशा कक्षांप्रमाणे शासकीय रुग्णालयांमध्येही सुधारणा करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. त्याप्रमाणे प्रायोगिक तत्वावर रुग्णालयामधील हृदयरोग विभागातील कक्षात अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून पंचतारांकीत रुग्णालयातील कक्षाप्रमाणे हा विभाग सुसज्ज करण्यात आला. त्यानंतर जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) अंतर्गत आणखी ४ कक्षांचे वातानुकुलीत सुखसुविधांसह नूतनीकरण करण्याचे निर्देश केसरकर यांनी दिले. या कामांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४१ कोटी रुपये निधी मंजूर केला. तसेच हसन मुश्रीफ यांनी जे.जे. रुग्णालयातील ३ शस्त्रक्रियागृहांचे नूतनीकरण राज्य निधीद्वारे करण्यास मंजुरी दिली.
त्याचप्रमाणे २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षामध्ये उर्वरित कक्ष आणि अन्य कामांसाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत वित्त विभागाकडून ७५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. जे. जे. रुग्णालयातील नूतनीकरणामुळे रुग्णालयात येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांना अधिक लाभ होईल, असे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.