मुंबई : रक्त तपासण्या, सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड, मूत्र, प्लाझ्मा आणि सीरममधील विविध घटक, रसायनांचे प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणारे पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ॲनालायझर यंत्र जे.जे. रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे जे. जे. रुग्णालयातील रक्त तपासण्या आता वेगाने होणार आहेत. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या हजारो रुग्णांना याचा लाभ होणार आहे.

जे. जे. रुग्णालयामध्ये दररोज बाह्यरुग्ण विभागामध्ये दोन ते अडीच हजार रुग्ण उपचारासाठी येतात. यापैकी बहुतांश रुग्णांना रक्त तपासणी, मूत्र तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्यामुळे जे. जे. रुग्णालयातील रक्त तपासणी केंद्रांमध्ये दररोज प्रचंड गर्दी असते. मात्र आता ही गर्दी आटोक्यात आणणे शक्य होणार आहे. जे. जे. रुग्णालयामध्ये चाचणी नमुन्यांच्या रासायनिक रचनेचा अभ्यास, मूल्यमापन आणि विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येणारे बायोकेमिस्ट्री ॲनालायझर हे अद्ययावत यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे. हे यंत्र प्रति तास २,८०० चाचण्या करते, त्यात दोन हजार रसायनिक आणि ८०० इलेक्ट्रोलाइट चाचण्या समाविष्ट आहेत. नवीन ॲनालायझर नियमित बायोकेमिस्ट्री चाचण्या, विशेष प्रथिन चाचण्या, उपचारात्मक औषध निरीक्षण आणि युरीनमध्ये ड्रग्स ऑफ अब्युझ शोधण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, ज्यामुळे निदानाची अचूकता आणि कार्यक्षमता आणखी वाढेल. उच्च कार्यक्षमता, अचूकता आणि वेग यामुळे हे उपकरण जे. जे. रुग्णालयाच्या बायोकेमिस्ट्री विभागासाठी एक मोठे वरदान ठरणार आहे. या यंत्रामुळे निदान प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होईल, असे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

जे. जे. रुग्णालयाच्या बायोकेमिस्ट्री विभागात स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ॲनालायझर हे यंत्र जीआसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या सामाजिक उत्तरदायित्त्वाच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्टतर्फे उपलब्ध करण्यात आले आहे. जे. जे. रुग्णालयामध्ये ११ मार्च २०२५ रोजी बायोकेमिस्ट्री ॲनालायझर यंत्राचे उद्घाटन झाले. यावेळी जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, विभागप्रमुख, बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी दळवी, बालरोग चिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुशांत माने आणि वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते. याशिवाय, रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य सल्लागार डॉ. बाळ इनामदार आणि जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या मुंबई शाखेचे शाखा व्यवस्थापन किरण लाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कॉर्पोरेट कंपन्या आणि सामाजिक संस्थांमधील सहकार्य आरोग्य सेवा मजबूत करण्यास कसे महत्त्वाचे आहे, याचा प्रत्यय या सोहळ्यात आला.

जीआयसी हाऊसिंग फायनान्स आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट यांच्या सहकार्यामुळे रुग्णालयातील रक्त व चाचण्या करण्याची सेवा अधिक सक्षम होण्यात मदत होईल. यामुळे अधिकाधिक रुग्णांना वेगवान आणि अचूक निदान मिळेल. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांच्या पुढाकाराने जे.जे. रुग्णालय गरजू आणि गरीब रुग्णांना उत्तम दर्जाच्या सेवा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. – डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय

Story img Loader