इन्टिरिअर डिझाइन ही कलेचीच अभ्यासशाखा मानली जाते आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा राज्य सरकारच्या कला महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम चालवला जातो. मुंबईत, ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चा जो ‘फाइन आर्ट’ विभाग आहे, तिथेच हे वर्ग चालतात आणि ‘जेजे’च्या वार्षिक प्रदर्शनात रेखा व रंगकला, शिल्पकला, मुद्राचित्रण या तीन विभागांप्रमाणेच वस्त्रकला आणि इन्टिरिअर डिझाइन यांनाही स्थान असतं (ते दोन विभाग ‘उपयोजित कला विभागा’ला जोडलेले नाहीत). ‘जेजे’मध्ये महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या नंतर नवा अभ्यासक्रम सुरू झाला, तो ज्या जर्मन ‘बाऊहाऊस’च्या (१९३०च्या दशकातल्या) अभ्यासक्रमापासून प्रेरणा घेऊन आखलेला होता, त्या ‘बाऊहाऊस स्कूल’मध्येही घरगुती वापराच्या वस्तूंचं किंवा फर्निचरचं डिझाइन करणं, हा महत्त्वाचा भाग मानला जाई. या महाविद्यालयीन परिघाबाहेर मात्र आपल्याकडे, वस्त्रकला तसंच इन्टिरिअर डिझाइनच्या स्नातकांना उपयोजित कामंच करावी लागतात. यापैकी वस्त्रकलेचे कलात्म आविष्कार फॅशन शोंमध्ये दिसत असूनही त्याकडे सौंदर्यविधान म्हणून पाहिलं जात नाही. इन्टिरिअर डिझाइनची स्थिती तर जगभर थोडय़ाफार प्रमाणात अशीच असते. ‘बाऊहाऊस’ची भूमी असणाऱ्या जर्मनीतही ही स्थिती फार निराळी आहे असं नाही, फक्त तिथं ‘डिझाइन’ला एकंदर वाव आणि मान आहे. त्यापुढलं एक पाऊल जर्मन संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय सेतू बांधू इच्छिणाऱ्या आयएफए आणि गुटे इन्स्टिटय़ूट- आपलं ‘मॅक्समुल्लर भवन या संस्थांनी उचललं. जर्मनीतल्या इन्टिरिअर डिझायनरांकडून उपयोजित हेतू बाजूला ठेवून कलेच्याच हेतूनं घडलेल्या अशा ‘कलाकृतीं’चं प्रदर्शन योजून त्यांनी हे मोठं प्रदर्शन जगभरातल्या प्रमुख शहरांत नेलं..
..हे प्रदर्शन आत्ता मुंबईत आहे! रीगल सिनेमाच्या चौकातल्या ‘राष्ट्रीय आधुनिक कलादालना’च्या (एनजीएमए) पाचही मजल्यांवर या कलाकृती पाहायला मिळतात आणि मुंबईतल्या प्रदर्शनाचं वैशिष्टय़ म्हणजे, श्रेयस कर्ले आणि शिल्पा गुप्ता यांच्याही कलाकृती याच प्रदर्शनाचा भाग म्हणून (फक्त मुंबईपुरत्या) प्रदर्शित झाल्या आहेत. हे प्रदर्शन पाहताना कलाकृती पाहाणं- त्यापैकी काही कलाकृतींच्या आतमध्ये शिरणं किंवा त्यांना हात लावणं, व्हिडीओ पाहणं, असा विविधांगी अनुभव घेता येईलच; पण प्रत्येक कलाकृतीसोबतची इंग्रजी टीप जर वाचलीत, तर हिला ‘कलाकृती’ का म्हणायचं, हे अधिक लक्षात येईल. कुठेही एका खोक्यात नेऊन उभारता येण्याजोगा गोल चौखणी फिरता दरवाजा (इव्हा हर्ट्ष व अॅडम पेज) किंवा चार खुच्र्याचा ‘रिव्हॉल्व्हिंग’ समूह (हाय्डे डीगर्ट) या ‘कलाकृती’ नसून उपयुक्त वस्तूच अधिक आहेत असं वाटेल, पण त्याउलट अगदी वरच्या मजल्यावरलं जॉन बॉक यानं बनवलेलं विचित्र गलबत, एरिक ष्मिड यांनी फुलांच्या छायाचित्रावरच बनवलेली मोठ्ठी ‘डू नॉट डिस्टर्ब’ अशी पाटी, योहानस स्पेहर यांनी एका छोटय़ा खोलीवजा रचनेच्या आत काढलेली अगदी लहान आकाराची ‘खासगी- सार्वजनिक’ जीवनाची रेखाचित्रं, इसा मेल्सहायमर यांनी बनवलेलं भूदृश्यवजा कारंजं.. आदी कलाकृतींकडे पाहताना हे निव्वळ डिझाइन नव्हे, इतपत दाद तरी कुणीही नक्कीच देईल.
निराळ्या शक्यता, निराळे विचार आणि निराळी कलाकृती हे तिहेरी नातं शिल्पा गुप्ता आणि श्रेयस कर्ले यांच्या कलाकृतींतही दिसून येतं. यापैकी श्रेयस कर्ले यांनी वस्तूंपासून डिझाइनकडे आणि त्या डिझाइनच्या हेतूंमधून कलेकडे, असा प्रवास केला आहे. शिल्पा गुप्ता यांची आरसा असलेली कलाकृती (सोबतचं चित्र पाहा) ही शब्दांचा माणसांवर होणारा परिणाम ‘पाहण्या’च्या गुप्ता यांनी एरवीही अन्य काही कलाकृतींमध्ये वापरलेल्या तंत्राशी मिळतीजुळती आहे.
हे प्रदर्शन १६ डिसेंबपर्यंतच आहे आणि या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टसाठी दहा रुपये तिकीट आहे.
‘साक्षी’तली छायाचित्रं
अमरीश वैद्य यांनी टिपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन ‘साक्षी गॅलरी’मध्ये ३ डिसेंबपर्यंत सुरू आहे. शहराच्या भौमितिक म्हणावी अशा रचनेला काही वेळा कसकसे छेद जातात, याचा दृश्य-शोध घेणाऱ्या या प्रदर्शनाचं नाव ‘इन द स्पेस बिट्वीन’ असं आहे. यातील अनेक फोटो मुंबईचे आहेत. बसस्टॉप, इमारती, इमारत बांधणीच्या वेळी लावलेल्या जाळ्यांआडून दिसणाऱ्या दुसऱ्या इमारती.. शहरी प्रकाश पडलेली झाडं.. अशी रोजचीच ही दृश्यं आहेत. पण वैद्य यांनी पिक्टोरिअल फोटोग्राफी शैलीनं ती टिपताना, रेषा-अवकाश यांच्यातलं सौंदर्य कसं खुलेल याचा विचार केलेला दिसेल.
कुलाब्याला शहीद भगतसिंग मार्गावरून (कॉजवेवरून) रेडिओ क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर, ग्रॅण्ट बिल्डिंग या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याइतक्या उंचीवर ‘साक्षी गॅलरी’ आहे. याच मजल्यावर, साधारण समोरच ‘लकीरें गॅलरी’ आहे; तिथं सध्या प्रदर्शन सुरू नाही.