शिवसेनेचे मात्र ‘जय आंध्र’
आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या विरोधात देशभरातील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याच्या कार्यक्रमांतर्गत सोमवारी मुंबईत आलेले जगनमोहन रेड्डी यांच्या सुरात सूर मिसळवून शिवसेनेने ‘जय आंध्र’चा नारा दिला. राष्ट्रवादीचा स्वतंत्र तेलंगणाला पाठिंबा आहे, पण राज्य विभाजनासाठी विधानसभेच्या कौलाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे सांगत शरद पवार यांनी जगनमोहन यांना खुशही केले नाही वा नाराज होणार नाहीत याची खबरदारी घेतली. तसेच लोकशाहीवर विश्वास असणारे जगनमोहन यांच्या मताशी सहमत होतील, अशी टिप्पणी करीत काँग्रेसला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला.
वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेतल्या. शिवसेनेने अखंड महाराष्ट्राचा नेहमीच पुरस्कार केला आहे. यामुळे आंध्र प्रदेश अखंड ठेवण्याच्या रेड्डी यांच्या मागणीस उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला. शरद पवार यांनी ठोस भूमिका घेण्याचे टाळले. नऊ वर्षांंपूर्वीच स्वतंत्र तेलंगणास पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला होता. तरीही जगनमोहन यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची आहे. यावर मी सहकाऱ्यांशी चर्चा करेन तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीपुढे मांडीन,  असे पवार यांनी सांगितले.
राज्य विभाजनाबाबत विधानसभेचा कौल महत्त्वाचा असतो. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राज्य विधिमंडळाला विश्वासात घेतले जावे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. तसेच राज्य विभाजनाबाबत घटनेच्या तिसऱ्या कलमात सुधारणा करण्याची आवश्यकता जगनमोहन यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेत २७२ सदस्यांच्या पाठिंब्यावर एखाद्या राज्याचे विभाजन होणार असल्यास ते चुकीचे आहे. यासाठी घटनेत दुरुस्ती करून दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा ही अट ठेवावी, अशी भूमिका जगनमोहन यांनी मांडली. विशेष म्हणजे जगनमोहन यांच्या भूमिकेस पवार यांनी पाठिंबा दर्शविला.
आंध्रच्या विभाजनाबाबत कोणतीही भूमिका सद्यस्थितीत मांडणे योग्य होणार नाही. मात्र त्याच वेळी जगनमोहन रेड्डी यांनी मांडलेल्या भूमिकेकडे दुर्लक्षही करता येणार नाही, असे सांगत पवार यांनी काँग्रेसचे कट्टर विरोधक असलेले जगनमोहन नाराज होणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी घेतली. राज्य विधानसभेला डावलून कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, अशी भूमिका मांडत पवार यांनी काँग्रेसला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला.  
जगनमोहन यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत पवार यांनी कोणताही राजकीय कार्यक्रम नसल्याचे स्पष्ट केले.

Story img Loader