मुंबई : महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२४’ अंतर्गत शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राडारोडा, घनकचरा संकलनाबरोबरच स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता संवाद, स्वच्छता फेरी, मानवी साखळी, जनजागृतीपर पथनाट्य आयोजित करून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, विविध पर्यटनस्थळांवर शून्य कचरा मोहीम राबविण्यात आली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याचे आयोजन केले आहे. यावर्षी स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांत शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत रस्ते – पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच दुभाजकांची स्वच्छता, सार्वजनिक भिंती – कचराकुंड्यांची स्वच्छता, बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, फेरीवाला विरहित क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर आदी कार्यवाही करण्यात आली.
हेही वाचा – पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : १२ वर्षे उलटूनही खटला प्रलंबितच, आरोपी मुनीब मेमनला जामीन
डी विभागात श्रीमद् राजचंद्रजी मार्ग (ऑपेरा हाऊस), बाळाराम मार्ग, एफ उत्तर विभागात वडाळा येथील बरकत अली नाका, शांतीनगर, जी दक्षिण विभागात लालबाग येथील गणेश गल्ली, एच पूर्व विभागात वांद्रे – कुर्ला संकुल, के – पूर्व विभागात मुळगाव डोंगरी येथील मेस्त्री औद्योगिक वसाहत, एल विभागात सम्राट अशोक मार्ग, बंटर भवन, एम पूर्व विभागात देवनार वसाहत, संविधान चौक, एम पश्चिम विभागात माहुल गाव, एन विभागात घाटकोपर पश्चिम येथील माता रमाबाई आंबेडकर नगर, पी दक्षिण विभागात मुख्य जोड रस्ता, अंतर्गत रस्ते, पी उत्तर विभागात मंडपेश्वर लेणी, आर दक्षिण विभागात काडसिद्धेश्वर मार्ग, एस विभागात कन्नमवार नगर, टी विभागातील मुलुंड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १०७ आदी ठिकाणी शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मुंबई स्वच्छ व सुंदर करण्याबरोबरच मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबईला देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना मुंबईकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छता ही प्राथमिक गरज असून ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे. यासाठी मुंबईकर नागरिकांची साथ आणि सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले.
मुंबईतील चौपाट्यांवर विशेष स्वच्छता मोहीम
आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त महानगरपालिकेतर्फे जुहू, स्वराज्य भूमी, दादर, चिंबई, वेसावे, मढ व गोराई चौपाटीवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याबरोबरच बधवार पार्क, गेट वे ऑफ इंडिया, जमशेद बंदर, मार्वे किनारा, कार्टर मार्ग किनारा, माहीम रेतीबंदर, बँड स्टँड आदी ठिकाणीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.