मुंबई : वारणा नदी काठावरील गुऱ्हाळघरांचा अस्त झाला आहे. कंदूर (ता. शिराळा) येथील शेवटचे गुऱ्हाळघर यंदा फक्त आठवडाभर चालून बंद पडले. दहा वर्षांपूर्वी नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर दीडशेहून जास्त गुऱ्हाळे धडधडत होती. पण, यंदा शेवटच्या गुऱ्हाळघराचीही धडधड बंद झाली.
वारणा नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे शिराळा आणि वाळवा तालुक्यात नदीच्या किनारी भागांत मोठ्या प्रमाणावर ऊस शेती होते. साखर उद्योगाची भरभराट होण्यापूर्वी वारणा खोऱ्यात मोठ्या संख्येने गुऱ्हाळे होती. दहा वर्षांपूर्वी किमान दीडशे गुऱ्हाळघरांच्या चिमण्यातून धूर काढत होत्या. गत वर्षी कंदूर (ता. शिराळा) येथील सुभाष पाटील यांचे एकमेव गुऱ्हाळ सुरू होते. यंदाही पाटील यांनी गुऱ्हाळ सुरू केले. पण, जेमतेम आठवडाभर चालविले आणि कामगारांचा तुटवडा आणि उत्पादन खर्चही न निघणाऱ्या गुळाच्या दरामुळे गुऱ्हाळ बंद केले. पाटील यांचे एकमेव गुऱ्हाळघर बंद पडल्याने वारणा नदीकाठावरील गुऱ्हाळघरे आता इतिहास जमा झाली आहेत.
हेही वाचा >>> करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न गरजेचे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची सूचना
गुऱ्हाळ चालक सुभाष पाटील म्हणाले, यंदा गुऱ्हाळ सुरू केले. आठवडाभर चालविले. पण, गुळाला ३७ ते ३८ रुपये किलो दर मिळाला. इतका कमी दर मिळाला तर गुऱ्हाळघर चालू शकत नाहीत. उत्पादन खर्चही निघत नाही. किमान ४२ रुपये किलो दर मिळाला तर कामगार, वाहतूक आणि गुऱ्हाळघराचा खर्च निघतो. यंदाच मोठी जोखीम पत्करून, पदरमोड करून गुऱ्हाळघर सुरू केले होते. वारणा पट्ट्यातील माझे शेवटचे गुऱ्हाळघर होते, तेही बंद पडले.
हेही वाचा >>> प्रत्येक दहशतवादी प्रकरणाचा तपास जातीय पूर्वग्रहातून, दोषसिद्ध आरोपींचा उच्च न्यायालयातील अपिलात आरोप
कर्नाटकचा भेसळयुक्त गुळ गुऱ्हाळघरांच्या मुळावर
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागांत अनेक गुऱ्हाळघरे आहेत. साखर स्वस्त असल्यामुळे गुळात साखरेचा बेसुमार वापर करतात. गूळ आकर्षक दिसण्यासाठी पिवळा, जिलेबी रंगाचा वापर करतात. गंधक प्रमाणापेक्षा जास्त वापरल्यामुळे गूळ पिवळा दिसतो. भेसळयुक्त गूळ आरोग्याला अपायकारक आहे. हा गूळ कोल्हापूर, सांगली, कराडच्या बाजारात येतो. त्यामुळे आमच्या दर्जेदार गुळाचा भाव पडतो. बाजार समित्यांना कर मिळतो. व्यापाऱ्यांचा धंदा होतो. त्यामुळे कर्नाटकचा गूळ कऱ्हाड, सांगली, कोल्हापूरचा गूळ म्हणून विकला जातो. भेसळयुक्त गुळाशी आम्ही स्पर्धा करून शकत नाही. उत्तर प्रदेश, बिहार येथून मजूर आणून व्यवसाय केला तरीही मजूर टिकत नाहीत. दुसरीकडे गुळाचे दर गत दहा वर्षांपासून प्रति किलो ४० रुपयांच्या वर गेले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने गुऱ्हाळघरे बंद करावी लागत आहेत, असेही सुभाष पाटील म्हणाले.
गुळाचे दर अनेक वर्षांपासून स्थिर गुळात सर्रास साखरेची भेसळ केली जाते. साखरेचे दर पडल्यामुळे साखर मिसळून गूळ तयार करण्याचा कल वाढला आहे. कऱ्हाड, सांगली, कोल्हापूरचे पारंपरिक गुऱ्हाळघरे या स्पर्धेत टिकू शकली नाहीत. आता पुण्यातील केडगाव, पाटस. लातूर आणि कर्नाटकातील रायबाग येथून गुळाची आवक वाढली आहे. दिवाळीनंतर दरवर्षी दर पडतात आणि मकर संक्रातीनंतर वाढतात. गेल्या अनेक वर्षांपासून दर स्थिर आहेत, असे गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.