शरीरातील एखाद्या अवयवाच्या निष्क्रियतेमुळे जीव गमवावा लागू नये यासाठी करण्यात येणाऱ्या अवयवदानात जैन आणि गुजराती समाज मोठय़ा प्रमाणात पुढे येत आहे. देशात १९९५ पासून ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा’ लागू करण्यात आला, तर मुंबईमध्ये २००० साली प्रादेशिक प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यात आले. या १६ वर्षांत २८० लोकांनी अवयवदान केले असून यातील ५५ टक्के म्हणजेच १५४ जैन आणि गुजराती समाजातील नातेवाईक ब्रेनडेड रुग्णाला अवयवदानासाठी पुढे करीत असल्याचे ‘प्रादेशिक प्रत्यारोपण केंद्रा’चे (झेडटीसीसी) राहुल वासनिक यांनी सांगितले, तर उरलेले ४५ टक्के हे मराठी आणि ख्रिस्ती समाजातील रुग्ण आहेत. मुंबईतील ३५ रुग्णालयांमध्ये अवयवप्रत्यारोपण केले जात असून यासाठी ब्रेनडेड झालेल्या रुग्णालयांच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले जाते. ही संकल्पना त्यांना पटते आणि ते आपल्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दान करण्यासाठी तयार होतात. आपल्या मृत नातेवाआकाच्या अवयवामुळे दुसऱ्या व्यक्तीला नवजीवन मिळणार असेल तर ते अवयवदान करण्यासाठी तयार होतात. तर अनेक जागृत जैन आणि गुजराती समाजातील लोक स्वत:हून आपल्या ब्रेनडेड रुग्णाला अवयवदानासाठी पुढे करतात असेही वासनिक यांनी नमूद केले.
सहा वर्षांची प्रतिक्षा..
गेल्या काही वर्षांपासून लोकांमध्ये अवयवदानाबाबत जागृती निर्माण झाल्यांमुळे कित्येक कुटुंबीय आपल्या ब्रेन डेड रुग्णाला अवयवदानासाठी डॉक्टरांकडे सोपवित आहे. अवयवदान करण्यामध्ये वाढ झाली असली तरी अवयवांअभावी अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांची संख्या सुमारे ३२५७ पर्यंत आहे. यात केवळ मूत्रपिंडासाठी ३१०० रुग्ण प्रतिक्षा यातील असून १४० रुग्ण यकृतासाठी तर १७ रुग्ण ह्रदयाच्या प्रतिक्षेत आहेत तर अनेक रुग्ण २०१० पासून मूत्रपिंडाच्या प्रतिक्षा यादीत आहेत.
जैन समाजातील लोक एकमेकांना जोडून आहेत आणि समाजकार्य करण्यासाठी ही माणसे नेहमी एकत्र येतात. अवयवदानापूर्वीही गेली २५ वर्षे आमच्या समाजातील लोक डोळ्यांचे दान करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. सहकार्य करताना परताव्याची अपेक्षा न करता दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान मिळावे हा यामागील हेतु असतो. जैन समाज दुसऱ्याला सहकार्य करण्यासाठी कायम पुढे असतो.
-गौतम जैन, जैन समाज संघटक