जैन धर्मीयांच्या पर्युषणाच्या काळात मांसविक्रीवरील बंदीच्या मुद्द्यावरून शिवसेना आता अधिकच आक्रमक झाली आहे. जैनांनो, मुसलमानांच्या मार्गाने जाऊ नका, असे खडे बोल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रातून गुरूवारी सुनावण्यात आले. पर्युषणाच्या काळात मांसबंदी घालण्याचा निर्णय धर्मांधतेकडे झुकणारा असून या माध्यमातून महाराष्ट्राला डिवचू नका, अन्यथा वाईट परिणाम होतील. मात्र, जैनांना धर्मांध मार्गानेच जायचे असेल तर, देव त्यांचे रक्षण करो, असा इशाराच सेनेकडून जैन समाजाला देण्यात आला आहे.
याआधीही जैनांची ‘पर्युषण’ पर्वं होतच होती; पण कत्तलखाने व मांसाहारबंदीची थेरं तेव्हा कुणाच्या डोक्यातून निघाली नव्हती. मग हे सर्व आताच हट्टाने का केले जात आहे? हीच धर्मांधता मुसलमानांच्या डोक्यात भिनली व तो हिंदू समाजाचा कायमचा शत्रू बनला. ‘पर्युषणा’च्या नावाखाली महाराष्ट्राला डिवचू नका. ‘जगा आणि जगू द्या’ याच मंत्राप्रमाणे ज्याला जे खायचे आहे त्याला ते खाऊ द्या. उगाच अहिंसेची धार्मिक लुडबूड करू नका, असे शिवसेनेने या अग्रलेखाच्या माध्यमातून ठणकावून सांगितले आहे.
मुसलमानांप्रमाणे ‘अल्पसंख्याक’ म्हणवून घेत जैन बांधवही त्याच धर्मांध मार्गाने जाणार असतील तर देव त्यांचे रक्षण करो. कारण ९२-९३ सालात मुंबईत उसळलेल्या हिंसाचारात या गुजराती-जैन बांधवांचे रक्षण करण्याचे काम ‘हिंदू’ म्हणून मराठी बांधवांनी केले होते व धर्मांधांच्या हिंसेस हिंसेने उत्तर दिल्यामुळेच गुजराती-जैन बांधवांचे रक्षण झाले, जीव वाचले, त्यांच्या इस्टेटी वाचल्या. त्या काळातही ‘पर्युषण’ पर्वे आलीच होती. पण त्या हिंसाचाराचे समर्थन करण्यात आमचे जैन-गुजराती बांधव आघाडीवर होते. अगदी ‘मातोश्री’वर झुंडीच्या झुंडीने येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटून, ‘‘बाळासाहेब, तुम्ही होतात, शिवसेना होती म्हणून आमचे व उद्योगधंद्यांचे रक्षण झाले,’’ अशी कबुली देणाऱ्या लोकांना आज अहिंसेची भाषा करताना पाहून आश्चर्य वाटत असल्याचे लेखात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा