RPF Jawan Shoot : जयपुरहून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये ( गाडी क्र. १२९५६ ) सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या धक्कादायक घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आरपीएफ जवानाकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. यात एएसआयसह ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आरपीएफ जवानाला पोलिसांनी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा पहाटे साडेपाचच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन कुमार याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम मीना यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर बोरिवली स्थानकापूर्वी गाडीचा वेग मंदावल्यानंतर जवान चेतन कुमार याने पळ काढला.

यानंतर जयपूर-मुंबई एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली. ४ जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपी चेतन कुमारला भाईंदर येथे अटक करण्यात आली.

जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमधील एसी कोच अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला यांनी घडलेल्या घटनेबाबत ‘टीव्ही ९ मराठी’ला माहिती दिली आहे. “सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास डब्यात गोळीबाराचा आवाज आला. तेव्हा पाहिलं की, जवानाच्या हातात बंदूक होती. त्याने एएसआय यांना गोळी मारलेली. एएसआय खाली पडले होते. जवान हातात बंदूक घेऊन डब्यात फिरत होता. जवानाने अन्य प्रवाशांवरही गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे डब्यातील सर्व प्रवाशी घाबरले होते,” असा थरारक प्रसंग कृष्णकुमार शुक्ला यांनी सांगितलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaipur mumbai express firing 4 killed accused rpf jawan held what happen railway ac coach told ssa