मुंबई : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून आपल्या वरिष्ठांसह तीन प्रवाशांची हत्या केल्याच्या आरोपांतर्गत अटकेत असलेला रेल्वे पोलीस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन सिंह चौधरी हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तसेच, त्याला उपचारांची आणि त्यासाठी नागपूर मानसिक रुग्णालयात हलवण्याची आवश्यकता असल्याचे अकोला येथील कारागृह प्रशासनाने गुरुवारी मुंबईतील सत्र न्यायालयाला सांगितले.

चेतन याच्यावर सध्या दिंडोशी सत्र न्यायालयात खटला चालवण्यात येत आहे. चेतन याची प्रकृती १९ डिसेंबर रोजी बिघडली होती, असे पत्र अकोला कारागृह अधीक्षकांनी सत्र न्यायालयाला पत्र पाठवले होते. त्यामुळे, त्याला वैद्यकीय उपचारांसाठी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याची तपासणी केल्यानंतर, त्याच्यात मानसिक आजाराची लक्षणे आढळून आल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. तसेच, चेतन याला पुढील उपचारांसाठी नागपूर येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केल्याचे कारागृह अधीक्षकांनी पत्राद्वारे न्यायालयाला कळवले.

हेही वाचा : गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू, पालकांना चार लाख रुपये नुकसाभरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

तथापि, चेतन याने केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने कारागृह अधीक्षकांच्या दाव्याला विरोध करण्यात आला. तसेच, चेतन याच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात तो मानसिकरीत्या आजारी असल्याचे कुठेही नमूद करण्यात आले नसल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. किंबहुना, त्याच्या वैद्यकीय अहवालानुसार तो निरोगी असून मानसिक रुग्ण नसल्याचेही मृतांच्या कुटुंबीयांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले व अकोला कारागृह अधीक्षकांचे पत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तथापि, चेतन याला ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल करता येऊ शकते. त्याच्यावरील खटल्याचा विचार करताही ते सोयीचे असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने मात्र अद्याप या पत्राबाबत कोणताही आदेश दिलेला नाही.

Story img Loader