जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या १२९५६ जयपूर एक्स्प्रेसच्या बी ५ या डब्यात आज (३१ जुलै) सकाळी गोळीबार झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत आरपीएफच्या उपनिरिक्षकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या घटनेबाबतची माहिती दिली.
लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस सकाळी मुंबई सेंट्रलकडे येत होती. पहाटे ५.३० च्या सुमारास गाडीत सुरक्षेसाठी कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन सिंह याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम मीना यांच्यासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ही एक्सप्रेस मीरा रोड स्थानकाजवळ पोहोचायच्या काही मिनिटं आधी एका प्रवाशाने सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेमधील आपत्कालीन चेन ओढून गाडी थांबवली.
रवींद्र शिसवे म्हणाले, मीरा रोड स्टेशनजवळ रेल्वे थांबल्यानंतर चेतन सिंहने ट्रेनमधून उडी मारली आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मीरा रोड येथील जीआरपी आणि आरपीएफच्या पोलिसांनी धाडसाने चेतनला पकडलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे. यासह त्या ट्रेनमधील इतर आरपीएफ जवानांकडे चौकशी केली जात आहे. ज्या डब्यात गोळीबार झाला त्या डब्यामधील प्रवाशांकडेही आरपीएफकडून चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा >> “अजितदादा कमळाचा प्रचार करणार”, चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा टोला
चेतन सिंहने गोळीबार का केला? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी उपस्थित केला. त्यावर आयुक्त म्हणाले, आत्ता याप्रकरणी काहीच माहिती देता येणार नाही. कारण, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तपास सुरू करण्यात आला आहे. हे प्रकरण अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आत्ता याबद्दल अधिक माहिती देता येणार नाही. कारण ते क्रिमिनल जस्टिसच्या विरोधात आहे. याप्रकरणी तपास केला जाईल, चौकशी केली जाईल. दरम्यान, वेगवेगळी वक्तव्ये समोर येतील, ती एकत्र केली जातील, त्यांची खातरजमा केली जाईल. त्यानंतरच यासंबंधीची माहिती सर्वांसमोर मांडली जाईल.