आठ वर्षांपूर्वी, २००५ मध्ये जळगावच्या दीपस्तंभ नावाच्या संस्थेच्या मार्गदर्शन वर्गात शिकलेला राजेश पाटील नावाचा आदिवासी तरुण आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाला, म्हणून संस्थेत त्याचा छोटासा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्या समारंभात प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत तीन मुलं बसली होती. राजेशचं सत्काराला उत्तर देणारं भाषण सुरू होतं, आणि या तिघांच्या डोळ्यात एक स्वप्न फुलत होतं.. आठ वर्षांपूर्वीचं तिघांचं ते स्वप्न आज पूर्ण झालं. जळगाव, धुळे नंदुरबारसारख्या मागासलेल्या जिल्ह्यांतील आदिवासी, गरीब घरांत वाढलेली, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलं आजच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वीपणे चमकली आहेत. राजेंद्र भारुड आणि प्रवीण चौहाण या मुलांच्या यशानं त्यांच्या खेडेगावात आनंदाचं उधाण आलंय, तर त्यांची लहानशी घरं आनंदानं उजळून गेली आहेत..
आत्ता माझी आई, बहीण आणि भाऊ, आम्ही सगळे सेलिब्रेशन करतोय.. असं सांगताना राजेंद्रच्या आवाजातलं समाधान लपत नव्हतं. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील सामोडे गावातील भिल वस्तीत राजेंद्रचा जन्म झाला, तेव्हा त्याचे वडील हयात नव्हते. आईनं मोलमजुरी करून राजेंद्रला जपलं, वाढवलं. लहानपणापासून शाळेतील चमक दिसू लागल्यानं, आईनं काबाडकष्टांची हमी दिली, आणि राजेंद्रला शिकवलं. राजेंद्र गेल्या वर्षी मुंबईतून एमबीबीएस झाला, आणि यंदा युपीएससीच्या परीक्षेत चमकला.. डॉक्टर राजेंद्र आता कलेक्टर होणार आहे!
प्रवीण चौहाण या तरुणाची शिक्षणगाथाही अशीच. वडील वारल्याने चाळीसगाव तालुक्यातल्या खेडय़ात शाळेचं शिक्षण घेतलं, आणि पुढे शिक्षणासाठी हाती पैसा हवा, म्हणून प्रवीणनं डीएड केलं. शिक्षकाची नोकरी करत त्यानं पदवी घेतली, आणि एमपीएससी पूर्ण केलं.

Story img Loader