मराठवाडय़ाला काही वर्षांपूर्वीच लागलेल्या दुष्काळाच्या झळा अद्याप शमल्या नसून १९७२ च्या दुष्काळानंतर मुंबईत उभ्या राहिलेल्या दुष्काळग्रस्तांच्या वस्तीत आता नव्या दुष्काळग्रस्तांची भर पडत आहे. गेल्या वर्षीपासून दुष्काळाचा तडाखा तीव्र झाल्यानंतर अनेकांनी गावे सोडून मुंबईची वाट धरली आहे. यात विशेषत जालना जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त सध्या चेंबूर परिसरातील दुष्काळग्रस्तांच्या जुन्या वस्त्यांमध्ये आसरा शोधत असून येथील अस्वच्छ वस्त्यांमध्ये आपला संसार नव्याने थाटू पाहत आहेत.
मराठवाडा व विदर्भात दुष्काळामुळे सध्या परिस्थिती गंभीर झाली असून येथील दुष्काळाने बाधित गावांतील नागरिकांना आपली घरे सोडण्याची वेळ आली आहे. १९७२ साली पडलेल्या मोठय़ा दुष्काळानंतर अनेकांनी मुंबईची वाट धरली होती व चेंबूर परिसरातील काही भागांमध्ये आसरा मिळवला होता. चेंबूर स्थानकापासून दहा मिनिटांवर पूर्व द्रुतगती मार्गालगत श्रमजीवी नगर वस्ती असून १९७२ साली येथे दुष्काळग्रस्तांची ७० ते ८० कुटुंबे येऊन स्थायिक झाली होती. जालना जिल्ह्य़ातील हरदखेडे या गावातील बहुतेक सर्वच ग्रामस्थ येथे स्थायिक झाले. कालांतराने बीड, औरंगाबाद जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्तदेखील स्थायिक झाले. आताही जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हातगाव, बोधनापुरी या गावांतील शंभर तरुण चार-पाच महिन्यांपूर्वी येथे आले असून कचरा व नालेसफाईची कामे या तरुणांनी पत्करली आहेत. ही संख्या वाढतच असून चार महिन्यांपूर्वी येथे दुष्काळी भागातून आलेल्या सुमन साळवे म्हणाल्या की, गावात पाणी नाही त्यामुळे आम्ही येथे आलो असून सध्या रस्त्यावरचा कचरा वेचण्याची कामे करतो. थोडे पैसे मिळत असल्याने मी माझ्या गावातील काही नातेवाईकांना येथे १५ दिवसांपूर्वीच बोलावून घेतले आहे. त्यामुळे, सध्या या वस्तीतील घरांची संख्या ३५० च्यावर गेली असून दररोज नव्याने कुटुंबे येथे येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा