करोना विषाणूच्या वाढत्या फैलावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे देशवासियांना आवाहन केले होते. त्याला जनतेने मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, हा कर्फ्यू पुढेही सुरु राहू शकतो, असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.
आज पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यू ही ट्रायल आहे. गर्दी टाळण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. राज्यातील परिस्थिती पाहता इथे आठ दिवसांपूर्वीच अशा उपाययोजना करण्याची गरज होती. त्याचमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून हा जनता कर्फ्यू वाढवण्याची शक्यता आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
राऊत म्हणाले, “जनतेला केवळ आवाहन करुन उपयोग होणार नाही त्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. यासाठी चीनने वापरलेला हुकुमशाहीचा आदर्श आपल्याला ठेवावा लागेल. या जनता कर्फ्युमार्फत लोकांनी स्वतःवर बंधन लादून घेतली आहे त्यामुळे यावरुन कोणीही राजकारण करु नये, सध्याच्या परिस्थितीत राज्य वाचवण्याची गरज आहे.”
“देशातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे ती हास्यास्पद बाब नाही. कारण, आपली लोकसंख्या ही १३० कोटी इतकी आहे. आपल्याकडे लोक दाटीवाटीनं राहतात. या तुलनेत इटली, जर्मनी आणि युरोपिय देशांची गर्दी कमी आहे, तरीही तिथे हा विषाणू वेगानं पसरला. त्यामुळे आपल्याला तर याचा अधिक धोका आहे,” असे राऊत म्हणाले.
करोनाच्या सावटातून सावरल्यानंतर आपल्याला आर्थिक त्रासाला सामोर जावं लागणार आहे. मात्र, सध्या आपल्याला जनतेचे प्राण वाचवणे जास्त महत्वाचे आहे. नुसतं भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणणे तसेच गो हत्या केली म्हणून माणसांना मारणं म्हणजे राष्ट्रभक्ती नव्हे. तसेच भाषणबाजी आता पुरे झाली अशा शब्दांत त्यांनी राजकीय नेत्यांना टोला लगावला.