मुंबई : महाराष्ट्राच्या नाटय़परंपरेच्या वैभवशाली इतिहासात अजरामर झालेले महानाटय़ ‘जाणता राजा’ पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे. १४ ते १८ मार्च दरम्यान दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच शिवतीर्थावर या महानाटय़ाचे प्रयोग रंगणार असून रसिकांना ते विनामूल्य पाहता येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि दर्जेदार ओघवत्या लेखनातून जन्माला आलेले हे महानाटय़ रसिकांच्या मनात घर करून आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून पुन्हा ‘जाणता राजा’चे प्रयोग रंगणार आहेत. या महानाटय़ाच्या निमित्ताने  शिवचरित्राचे प्रेरणादायी महापर्व शिवतीर्थावर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. नव्या पिढीपर्यंत महाराजांचे महान कार्य पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असून, शिवतीर्थावरील हा प्रयोग मुंबईकरांना प्रेरणा देणाराच ठरेल, असे मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.

या महानाटय़ाचे प्रायोजक निशांत देशमुख म्हणाले की, पाठय़पुस्तक व कथांमध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन महानाटय़ाच्या माध्यमातून आजच्या पिढीला पुन्हा अनुभवता यावे आणि जनमानस  अलौकिक अशा शिवचरित्राशी जोडले जाऊन हा सुवर्ण शिवकाळ जगता यावा, या उद्देशाने आम्ही हे महानाटय़ लोकांसमोर आणत आहोत.

असे आहे महानाटय़

मराठेशाहीचा सुवर्णकाळ अनुभवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते छत्रपतींचा राज्याभिषेक या दोन महत्त्वाच्या घटनांमधील महानाटय़ रंगमंचावर मांडण्यात आले आहे. ८० फूट लांब आणि ४० फूट रुंद असलेल्या प्रशस्त रंगमंचावर हत्ती, घोडे आणि २०० कलाकारांसह मराठेशाहीचा सुवर्णकाळ रसिकांना मुंबईत पाहायला मिळणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janata raja again at shivtirtha park 14th to 18th march ysh