मद्यपान केलेल्या अवस्थेत वाहन चालवून मुंबईतील पूर्व मुक्त मार्गावर दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या जान्हवी गडकर हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली. जान्हवी गडकर हिला न्यायालयाने २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर तिच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. गेल्या सोमवारी बुधवारी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आज ही सुनावणी २२ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली.
मद्यपान करून ऑडी गाडी चालविणाऱ्या जान्हवी गडकरने ८ जून रोजी पूर्व मुक्त मार्गावर चुकीच्या मार्गिकेतून गाडी नेली आणि एका टॅक्सीला धडक दिली. या अपघातात दोन जण ठार झाले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेने पोलिसांना सादर केलेल्या अहवालात जान्हवीने निर्धारित प्रमाणापेक्षा चौपट मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले आहे. १०० मिलिलिटर रक्तात ३० मिलिग्रॅम अल्कोहोल असण्यास मान्यता आहे. मात्र, जान्हवीच्या रक्तात हेच प्रमाण १२० मिलीग्रॅम एवढे आढळले होते.