मुंबई : दोन वर्षांपूर्वी खार येथील एका इमारतीत मृतावस्थेत सापडलेल्या जान्हवी कुकरेजा या महाविद्यालयीन तरूणीच्या हत्येशी संबंधित प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावे आहेत. शिवाय पोलिसांचा खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असून हे पुरावे आरोपी श्री जोगधनकर यानेच गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी दर्शवत असल्याचे दिसून येते. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर केला तर तो हे पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण नोंदवून जोगधनकरला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

नवीन वर्ष आपल्यासमोर नव्या स्वप्नांची संधी घेऊन येते. नवे वर्ष हे पुस्तकाप्रमाणे असते आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचा अध्याय लिहिण्याची वाट पाहत असते. परंतु २०२१ या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका तरुणाला दलदलीत ढकलले, असेही न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी जोगधनकर याची जामिनाची मागणी फेटाळतना नमूद केले.

जोगधनकरने एका मैत्रिणीच्या साथीने खास मैत्रीण असलेल्या जान्हवीची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या आरोपानुसार, जोगधनकर, जान्हवी आणि त्यांची मैत्रीण दिया पडळकर तिघेही अन्य मित्रांसह नववर्षाच्या पार्टीसाठी गेले होते. परंतु जोगधनकर आणि जान्हवीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि त्याने दिला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे, तर त्याने रक्तबंबाळ झालेल्या जान्हवीला आठव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर पायऱ्यांनी फरफरट आणले. हा घटनाक्रम आणि त्याच्याशी संबंधित परिस्थितीजन्य पुरावे, प्रकरणातील साक्षीदार मित्र या बाबी लक्षात घेतल्या तर जोगधनकर पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचमुळे त्याला जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले.

घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रिकरणाच्या आधारे जान्हवीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी जोगधनकर आणि दिया पडळकर या दोघांना अटक केली होती. दिया सध्या जामिनावर बाहेर आहे.

Story img Loader