मुंबई : गणेशोत्सव, होळी तसेच इतर सण – उत्सवांनिमित्त आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईस्थित कोकणवासीय कोकणाची वाट धरतात. त्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी २०० पेक्षा अधिक असते. गेल्या आर्थिक वर्षात जनशताब्दी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसला प्रवाशांची प्रचंड मागणी होती. त्यामुळे या कालावधीत या दोन्ही एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी प्रत्येकी ७६ हजार पार गेली होती. तसेच मध्य रेल्वेवरून कोकणात जाणाऱ्या १८ रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीत सुमारे पाच लाख प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांतून कोकणात रेल्वेगाड्या जातात. या रेल्वेगाड्यांना प्रवाशांकडून कायम प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या गाड्यांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही कालावधीतच रेल्वेची प्रतीक्षा यादी सुरू होते. १ एप्रिल २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत एकूण चार लाख ७३ हजार ९४८ प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळाली नाहीत. साधारणपणे एका दिवसाला सरासरी १,४९० प्रवासी प्रतीक्षा यादीत होते.

हेही वाचा – तीन वर्षांपूर्वी यामिनी जाधव अपात्र होणार होत्या, आज दक्षिण मुंबईच्या उमेदवार; जाणून घ्या प्रकरण

मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजार ४३७ इतकी असून त्यातील ६८ हजार ५५५ प्रवासी द्वितीय श्रेणी डब्यांच्या प्रतीक्षा यादीत होते. तर, दुसऱ्या स्थानावर मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस असून या रेल्वेगाडीची प्रतीक्षा यादी ७६ हजार ०१८ इतकी असून यामधील ६० हजार ६४२ प्रवासी हे शयनयान डब्यांच्या प्रतीक्षा यादीत होते. गेल्या आर्थिक वर्षात जनशताब्दी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसला प्रवाशांची प्रचंड मागणी होती. त्यामुळे या कालावधीत या दोन्ही एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजार पार गेली होती.

४०० पार प्रतीक्षा यादी

सध्या सीएसएमटीवरून मडगावला जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीची प्रतीक्षा यादी ४०० पार झाली आहे. तर, २८ एप्रिलपासून ते १५ मेपर्यंत अनेक दिवसांतील प्रतीक्षा यादीचीही क्षमता संपली आहे. त्याप्रमाणे सीएसएमटीवरून मडगावला जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या शयनयान डब्यांची प्रतीक्षा यादी ३०० ते ४०० दरम्यान आहे.

हेही वाचा – उद्या कोणी याचिका करून पद्म पुरस्काराची मागणी करेल, उच्च न्यायालयाचे हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांना खडेबोल

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची एकूणच प्रतिदिन प्रतीक्षा यादी आणि सर्वसाधारण तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहून रेल्वे प्रशासनाने चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडीसाठी कायमस्वरूपी वाढीव रेल्वे सोडणे आवश्यक आहे. तसेच या फेऱ्या सीएसएमटी, एलटीटी, दादर, पुणे, नागपूर येथून सोडल्यास प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. – जयवंत दरेकर, संस्थापक अध्यक्ष, कोकण विकास समिती

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janshatabdi konkankanya express waiting list at 76 thousand mumbai print news ssb
Show comments