डेंग्यू, हिवतापाने मुंबईकर त्रासले असताना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या काविळग्रस्त रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. वडाळ्याच्या ‘संयुक्त एकजूट गृहनिर्माण सोसायटी’मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने सोसायटीतील अनेक रहिवाशांना काविळीची बाधा झाली आहे.
वडाळा पश्चिमेला म्हाडा पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत निर्माण केलेल्या संयुक्त एकजूट गृहनिर्माण सोसायटीत सध्या काविळग्रस्त रुग्णांची संख्या वाढते आहे. या सोसायटीत साधारण एकूण ३०० ते ३५० कुटुंबे राहतात. सोसायटीला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या जमिनीअंतर्गत आहेत. परंतु, काही ठिकाणी या वाहिन्या सांडपाण्यातून जात आहेत. तसेच, पाण्याच्या टाकीच्या बाजूला मल वाहून नेणारे गटारही वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याची शक्यता रहिवाशी वर्तवित आहेत.
या शिवाय गेले १५ दिवस पाणी हलके गढूळ येत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. या पाण्याला कुबट वास येत असल्याचे महिला रहिवाशी सांगतात. या सगळ्याच कारणामुळे सोसायटीतील २५ ते ३० रहिवाशांना काविळची बाधा झाल्याचे दिसत आहे. काही कुटुंबात तर तीन सदस्य काविळीने बाधित आहेत. शिवाय संपूर्ण सोसायटीत या सगळ्या प्रकारामुळे घाणीचे आणि दरुगधीचे वातावरण पसरले आहे.
या सोसायटीतील रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सोसायटीच्या आवारात कित्येक महिने साचलेला कचऱ्याचा ढीग आणि मातीचा राडारोडा साफ करून घेतला होता. पण सोसायटीने नीट पाठपुरावा न केल्याने दूषित पाण्याचा प्रश्न हा तसाच राहिला आहे.