१३ ऑक्टोबर १९४९
भारत आणि अमेरिकेचे संबंध प्रारंभिक अवस्थेत होते. नेहरुंच्या अलिप्ततावादी धोरणाकडे आणि समाजवादी विचारसरणीकडे अध्यक्ष हॅरी ट्रमन यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका साशंकतेने पाहात होती. या पाश्र्वभूमीवर नेहरूंचे अमेरिकन काँग्रेस सदस्यांसमोर भाषण झाले..
‘‘मी अमेरिकेचे मन आणि हृदय शोधण्याच्या मोहिमेवर इथे आलो आहे आणि तुमच्यासमोर भारतीय मन आणि हृदय खुलं करू इच्छितो. त्यामुळे परस्परांना समजून घेणं आणि सहकार्य करणं, या प्रक्रियेला आपण चालना देऊ शकू. मला वाटतं आपल्या दोन्ही देशांची ती सुप्त इच्छा आहे. व्यक्तिप्रमाणेच कोणत्याही देशाचे प्राधान्य स्वावलंबन हेच असते. माझ्या देशात मोठी सुप्त आर्थिक क्षमता आहे, पण तिचे आर्थिक संपन्नतेत परिवर्तन करण्यासाठी आम्हाला तांत्रिक आणि यांत्रिक सहकार्याची गरज आहे. आपल्या उभयतांचे हित साधेल अशा या साह्य़ासाठीही आम्ही उत्सुक आहोत. मात्र त्यासाठी परिश्रमपूर्वक मिळविलेल्या आमच्या स्वातंत्र्याशी आम्ही कदापि तडजोड करणार नाही.’’
’ पंडित नेहरू.
१३ जून १९८५
अलिप्ततावादी धोरणाचा पुरस्कार करीत असूनही भारत रशियाच्या जवळ असल्याचे मानले जात होते. पाकिस्तानला होत असलेल्या लष्करी साह्य़ाबद्दल अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांच्याशी भारताचे संबंध ताणलेले होते. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान राजीव गांधी यांचा अमेरिका दौरा अत्यंत यशस्वी झाला. राजीव आणि त्यांच्या मातोश्री इंदिराजी यांच्यात दिवस आणि रात्रीइतका फरक आहे, या शब्दांत अमेरिकन अधिकाऱ्यांनी राजीव यांच्या खुल्या मनाचे माध्यमांमध्ये जाहीर कौतुक केले. रिगन आणि इंदिराजी या एकाच पिढीच्या असूनही रिगन आणि राजीव यांच्यातला संवाद अधिक सकारात्मक होता. याच काळात अंतराळ संशोधन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या हस्तांतराचे बीज रोवले गेले. अमेरिकन काँग्रेससमोर राजीव गांधी म्हणाले..
‘‘आमच्या नेत्यांनी गेल्या तीन दशकांत जो भक्कम पाया रचला आहे त्यावर आम्हाला नव्या समर्थ तरुण भारताची उभारणी करायची आहे. आमचा देश तरुण आहे आणि तरुणांप्रमाणेच प्रगतीसाठी तो अधीर आहे. मी तरुण आहे आणि माझे माझ्या देशासाठी एक स्वप्न आहे. माझा भारत मला समर्थ, स्वावलंबी आणि मानवजातीच्या सेवेत सर्व देशांमध्ये अग्रभागी असा हवा आहे. समर्पण, कठोर परिश्रम आणि माझ्या जनतेचा सांघिक निश्चय या बळावर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी बांधील आहे. या स्वप्नपूर्तीसाठी सर्व तऱ्हेच्या सहकार्याचे मी स्वागतच करतो.’’
’ राजीव गांधी
१८ मे १९९४
सोविएत युनियनचे विघटन झाले होते. शीतयुद्ध संपुष्टात आले होते आणि भारतात आर्थिक सुधारणांचे नवे पर्व सुरू झाले होते. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भेटीसाठी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी आखलेल्या अमेरिका दौऱ्याचे एकमेव लक्ष्य अर्थकारण हेच होते. भूतकाळाला मागे टाकून भविष्याकडे एकत्रित वाटचाल करण्याचे आवाहन राव यांनी या भेटीत दिले. अमेरिकन काँग्रेससमोर राव म्हणाले..
‘‘भारत आणि अमेरिकेत पूर्वापार वैचारिक आदानप्रदान राहिले आहे. अंतराने फरक पडत नाही. विशेषत: मन हे जर माध्यम असेल तर नवकल्पनांच्या आदानप्रदानात अंतर कधीच आड येत नाही. आता आपल्या वागण्यात कोणत्या गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये, याचा विचार करण्याची खरंतर तुम्हा आम्हाला आता तर सवडही नाही की उसंतही नाही. कारण भविष्याकडे आपलं सर्व लक्ष केंद्रित आहे. लोकशाही आणि विकास हाच त्यासाठीचा आधार आहे. माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून सांगतो की लोकशाही आणि विकास यांची सांगड कितीही कठीण वाटली तरी भारताच्या दृष्टीने ती अत्यंत आवश्यक आहे. पुढील शतकात जगाच्या प्रगती व शांततेसाठी भारताचे योगदान मोठे राहाणार असून त्यासाठी आम्हाला अमेरिकेशी दृढ मैत्रीची अपेक्षा आहे. आमच्या देशात विकासाची प्रक्रिया गतिमान झाली असली तरी कठोर परिश्रमांशिवाय ती साध्य नाही, हेही आम्हाला माहीत आहे.’’
’ पी. व्ही. नरसिंह राव
१४ सप्टेंबर २०००
अवघ्या दोन वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने आण्विक चाचण्या पार पाडल्याने अनेक जागतिक र्निबधांचे आव्हान भारतासमोर होते. त्याचवेळी भारतात आर्थिक सुधारणांचे वारे कायम राहिले आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची प्रगती मोठय़ा वेगाने झाली. अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कारकिर्दीत अमेरिकेचा दौरा करणारे वाजपेयी हे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले. काँग्रेससमोरील भाषणात ते म्हणाले..
‘‘आपल्याला जर लोकशाहीपूर्ण, संपन्न, संयमी आणि वैविध्यतेत एकता साधणारा आशिया हवा असेल तर जुन्या समजांचा फेरविचार करण्याची गरज आहे. नजिकच्या भविष्यात समर्थ, लोकशाहीपूर्ण आणि आर्थिकदृष्टय़ा संपन्न असा भारत आशियात दिमाखाने उभा राहिलेला दिसणार आहे. भारतामुळेच आशियाच्या स्थैर्याचा पाया भक्कम होणार आहे. संरक्षणाबाबत अमेरिकेशी आमचे मतभेद असले तरी माझ्या मते उभयतांमध्ये समान गोष्टीही कितीतरी अधिक आहेत. आम्ही तुमची नि:शस्त्रीकरणाची कळकळ जाणतो, पण तुम्हीही आमची संरक्षणाची चिंता जाणावीत, असे मला वाटते.’’
’ अटलबिहारी वाजपेयी
१९ जुलै २००५
आर्थिक संबंध दृढ होत असतानाच भारत आणि अमेरिकेने धोरणात्मक निर्णय घेऊन पुढचे पाऊल टाकले. अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी भारतासमोर नागरी अणुऊर्जा कराराचा प्रस्ताव ठेवला. त्याच्या मसुदा करारावर स्वाक्षऱ्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेससमोर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे भाषण झाले. ते म्हणाले..
‘‘नागरी अणुऊर्जा कराराचा मार्ग सुकर व्हावा यासाठी माझ्यात आणि बुश यांच्यात सहमती झाली आहे. आण्विक सुरक्षेबाबत आमचा इतिहास निश्चितच उत्तम आहे आणि आमच्या शेजारी देशांप्रमाणे आमची आण्विक सज्जता ही कोणासाठीही चिंतेची बाब ठरणार नाही. भारत आणि अमेरिकेने दहशतवादाविरोधात अधिक खंबीरपणे आणि एकत्रितपणे उभे ठाकले पाहिजे. दहशतवादाचा मुद्दा हा पक्षपाती होऊ नये. कारण कोणत्याही तऱ्हेचा दहशतवाद हा अखेर लोकशाहीलाच नख लावणारा असतो.’’
’ डॉ. मनमोहन सिंग