वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर कोरेगाव-भीमा प्रकरणात संभाजी भिडेंना क्लिनचिट देण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर आता स्वतः जयंत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “माझा संभाजी भिडेंशी कोणताही संबंध नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे काही पुरावा असेल तर त्यांनी तो पुरावा द्यावा,” अशी मागणी जयंत पाटलांनी केली. ते मुंबईत एबीपी माझाशी बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. माझा संभाजी भिडेंशी कोणताही संबंध नाही. गेले काही वर्ष त्यांचा संपर्कही झालेला नाही. त्यांना कोणत्या प्रकरणात क्लिनचिट मिळाली हेही मला माहिती नाही. त्यांनी कधीही माझ्याकडे येऊन मदत मागितली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी असे खोटेनाटे आरोप करणं योग्य नाही.”
“प्रकाश आंबेडकरांनी आरोपांबाबत पुरावे द्यावेत”
“प्रकाश आंबेडकर यांच्याकडे काही पुरावा असेल तर त्यांनी तो पुरावा द्यावा. मी या प्रकरणात तपास अधिकारी कोण आहे याचीही कधी चर्चा केलेली नाही. तसेच संभाजी भिडे यांना कोणत्या प्रकरणात क्लिनचिट मिळाली हेही मला माहिती नाही. ज्याबाबतीत क्लिनचिट दिल्याचा त्यांना संशय असेल त्याबाबत त्यांनी पुरावे द्यावेत. माझा संबंध नाही आणि उठसूठ कसेही आरोप करायचे हे योग्य नाही,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा : “विश्वास नांगरे पाटलांना निलंबित करा आणि…”; प्रकाश आंबेडकरांची मागणी
“प्रकाश आंबेडकरांनी भिडेंच्या पाया पडल्याचा माझा फोटा दाखवावा”
“मी संभाजी भिडेंच्या पाया पडल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर करतात, तर त्यांनी फोटो दाखवावेत. उगाच कसलेही आरोप करू नये. प्रकाश आंबेडकरांकडून असे खोटे आरोप करण्याची अपेक्षा नाही. भिडेंना क्लिनचिट कशी मिळाली याचं स्पष्टीकरण तपास संस्थेकडे मागितलं पाहिजे. तपास संस्था काही गोष्टी मांडत असताना कोणत्याही मंत्र्याने त्यावर बोलणं योग्य नाही. कारण असं काही बोलणं तपासावर प्रभाव पाडेल,” असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.