राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या घड्याळ या पक्षचिन्हाचं काय होणार यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (११ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या घड्या पक्षचिन्हाचं काय यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “आमच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का लागेल असं वाटत नाही. घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह कायम राहील. याबाबत माझ्या मनात शंका नाही. महाराष्ट्रापुरता हा विषय बघितलं, तर या चिन्हाला कोणताही धक्का लागत नाही असं दिसतं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा याची आम्हाला चिंता नाही.”
“…आणि पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल”
“अन्य राज्यात निवडणुका झाल्यावर आमची परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल,” असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला.
“…तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळू शकतो”
आयोगाच्या निर्णयावर जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत. गेल्या दोन वर्षात याबाबत सुनावणी झाली. यात आम्ही आमची बाजू मांडली होती. परंतू आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. या देशातील कोणते पक्ष राष्ट्रीय पक्ष राहू शकतात याविषयीच्या निकषात प्रत्येक निवडणुकीत काही बदल होत असतात. आगामी काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी सरस/समाधानकारक झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो. त्यात मला फार अडचण वाटत नाही.”
“या निर्णयावर मतमतांतरं आहेत”
“निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय देशातील इतर पक्षांबाबतही घेतला आहे. यात जुना असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचाही समावेश आहे. या निर्णयावर मतमतांतरं आहेत, मात्र आता निर्णय झाला आहे. यावर आमची केंद्रीय पक्ष समिती योग्य तो विचार करत आहे. आमच्या पक्षाचे केंद्रीय कार्यालय याबाबत माहिती घेऊन काम करत आहे,” असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.