उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करुन जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना दिलं होतं, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीसांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’मध्ये बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “माझ्यापुढं अशी कोणतीही चर्चा झाली नाही. याबाबत माजी गृहमंत्र्यांना विचारलं पाहिजे. मला वाटतही नाही आणि याची माहिती सुद्धा नाही. विरोधी पक्षनेत्याला अटक करणे म्हणजे लोकशाहीच्या विरुद्ध गोष्ट आहे. पण, अर्थसंकल्प कसा वाचायचा हे जाणून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस माझ्या घरी आले होते. आमचे संबंध द्वेषाचे नाहीत. माझ्यासमोर तर असे आदेश कोणी दिले नाही,” असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील कोणाला मिस करता? अशोक चव्हाणांकडे पाहून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
तसेच, “१९९० पासून आम्ही सभागृहात आहोत. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस भाषण सभागृहात भाषण केल्यानंतर मंत्री असल्याने कार्यालयात येऊन चहा घ्यायचे. व्यक्तीगत द्वेष, सूड कधीच नव्हता. मात्र, अलीकडच्या काळात भाषा खालच्या स्तरावर गेली आहे. शेलक्या शब्दांत एकमेकांत ( सत्ताधारी आणि विरोधक ) उपमर्द करण्याच्या प्रथा वाढलेल्या आहेत. कमी प्रतिमेची लोकं फार पुढं आली की असं होतं,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.
“यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्रात शब्द कसं वापरले पाहिजेत, हे शिकवलं आहे. अटल बिहारी वाजपेयी कित्येक वर्ष विरोधी पक्षाचे नेते होते, पण त्यांच्याकडून कधी असे शब्द गेले नाहीत. त्यांच्या मनासारखं नाही घडलं, तर उत्तम भाषणाने ते सत्ताधाऱ्यांचे दोष पुढं आणायचे. हे विरोधी पक्षाचं कौशल्य आहे,” असेही जयंत पाटील यांनी म्हटलं.
हेही वाचा : “…अन् उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी बंद केले”, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खंत
देवेंद्र फडणवीसांचा काय आहे आरोप?
“महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट माजी आयुक्त संजय पांडेंना दिलं होतं. मी काहीच केलं नव्हतं, ज्यामुळे ते जेलमध्ये टाकू शकतील. त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करा. जेलमध्ये टाका असे आदेश महाविकास आघाडी सरकारचे होते,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.