शरद पवार निवृत्तीच्या निर्णयावर ठाम आहेत. हा निर्णय घेऊ नये, यासाठी त्यांना अनेकांनी साकडे घालत आग्रह केला आहे. देशातील अनेक अध्यक्ष आणि नेत्यांनी शरद पवारांना हेच सांगितले आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी अध्यक्षपदी कायम राहावे, असे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्याचे मत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जयंत पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष करावे,’ अशी मागणी शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्याबद्दल प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले, “सरोज पाटील यांनी माझे नाव घेतले असले, तरीही मी महाराष्ट्रात काम करीत आहे. महाराष्ट्र सोडून दिल्लीत जाणार नाही. माझा दुसऱ्या राज्यात संपर्क नाही. लोकसभा किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या व्यक्तीला अशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शरद पवारांना तो अनुभव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशात वाढवू शकले.”

हेही वाचा : राहुल गांधी आणि एम.के स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन, शरद पवारांच्या अध्यक्षपदावर झाली चर्चा; नेमकं काय म्हणाले?

“सर्वांनी शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय योग्य नसल्याची विनंती केली आहे. पण, पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी काही तरी पावले टाकली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका दिसत आहे. २०२४ च्या विधानसभेपर्यंत आम्हाला सर्वांना काळजी आहे. लोकसभा आणि विधानसभेपर्यंत शरद पवारांनी अध्यक्ष राहावे,” असे जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचा भाजपाबरोबर जाण्यासाठी दबाब असल्याने शरद पवारांनी निवृत्ती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबद्दल विचारल्यावर जयंत पाटलांनी म्हटले, “अशा चर्चा सुरू असतात. तेवढ्यासाठी शरद पवार एवढा मोठा निर्णय घेणार असे वाटत नाही. पण, अशा चर्चांबद्दल मला माहिती नाही.”

हेही वाचा : “शिवसेनेपेक्षा मोदी राष्ट्रवादीला बरोबर घेण्यास अनुकूल होते”, ‘लोक माझे सांगाती’तील शरद पवारांच्या दाव्यावर संजय राऊत म्हणाले…

“पक्षातील कार्यकर्ते, नेते यांचे राजीनामा सत्र अद्यापही सुरू आहे. पक्षकार्यालयात बरेच राजीनामे आले आहेत. शरद पवारांच्या निर्णयाने अनेक जण निराश झाले आहेत. शरद पवार नसतील तर आपल्याला पक्षात न्याय मिळेल का? अशी भावना अनेकांची झाली आहे,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil on sharad pawar retired due pressure ncp leader go with bjp ssa